Tuesday, May 12, 2026
Homeजळगावजोगलखेडा रोडवर भीषण अपघात; भानखेड्यातील २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

जोगलखेडा रोडवर भीषण अपघात; भानखेड्यातील २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

विद्युत खांबाची धडक की अज्ञात वाहनाचा धक्का? अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ तालुक्यातील जोगलखेडा रोडवर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात भानखेडा येथील २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ज्ञानेश्वर चिंदू सोनवणे (वय २८, रा. भानखेडा, ता. भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार (दि. १२ मे २०२६) रोजी दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर सोनवणे हे साकेगाव येथून आपल्या गावाकडे दुचाकीने परतत होते. जोगलखेडा रोडवर, गावापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला.अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता नसून, दुचाकी विद्युत खांबावर आदळल्याने अपघात झाला की एखाद्या अज्ञात वाहनाने धडक दिली, याबाबत संभ्रम कायम आहे. त्यामुळे पोलिसांकडून विविध शक्यतांचा तपास सुरू करण्यात आला आहे.अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत ज्ञानेश्वर सोनवणे यांना तातडीने भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर

ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. घरातील तरुण कर्ता पुरुष अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात भानखेडा येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणी नितीन चिंदू सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात बीएनएसएस २०२३ अंतर्गत कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद (नोंद क्र. १७/२०२६) करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय भोई पुढील तपास करत असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या