Tuesday, May 12, 2026
Homeजळगावभुसावळ हादरले ! कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी ९ वर्षीय बालकाचा मृत्यू 

भुसावळ हादरले ! कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी ९ वर्षीय बालकाचा मृत्यू 

नगरपरिषद प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप, खन्ना कोळीच्या घरातून ५ कुत्री जप्त

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना नारायण नगर परिसरात कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ९ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याने शहरभर हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरले असून नगरपरिषद प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तारकेश विशाल झोपे (वय ९) हा विद्यार्थी दि. २४ एप्रिल रोजी सकाळी शाळेत जात असताना नारायण नगर परिसरात एका कुत्र्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यात त्याच्या चेहऱ्यावर व नाकावर गंभीर जखमा झाल्या होत्या. जखमांची तीव्रता इतकी होती की मुलाच्या चेहऱ्यावर तब्बल ८० टाके पडल्याचे समजते.घटनेनंतर त्याच्यावर जळगाव येथील शिल्पा हॉस्पिटलमध्ये डॉ. श्रीराज महाजन यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू होते. प्रकृती गंभीर असल्याने तसेच प्लास्टिक सर्जरीची गरज भासल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज त्याची प्राणज्योत मालवली. या दुर्दैवी घटनेमुळे झोपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शहरात मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव

भुसावळातील भिरूड कॉलनी, नारायण नगर, रिंग रोड, म्हाडा कॉलनी, चितोळे मंगल कार्यालय परिसर, गणेश कॉलनी आदी भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचे टोळके नागरिकांच्या मागे धावत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. लहान मुले, महिला, वृद्ध तसेच दुचाकीस्वारांना त्यामुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे.नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील वाढती अस्वच्छता, कचऱ्याचे ढीग आणि दुर्लक्षित परिसरांमुळे कुत्र्यांना पोषक वातावरण मिळत असून त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वारंवार तक्रारी करूनही नगरपरिषद प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

खन्ना कोळीच्या पाळीव कुत्र्यावर हल्ल्याचा आरोप

दरम्यान, संबंधित हल्ला हा नारायण नगरातील रहिवासी प्रकाश कोळी उर्फ खन्ना यांच्या पाळीव कुत्र्याने केल्याचा दावा परिसरातील नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.तसेच कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करणाऱ्या महिलांना प्रकाश कोळी यांनी अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. हा प्रकार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डमाळे यांच्या समोर मांडण्यात आला.

नगरपरिषदेची कारवाई; ५ कुत्री जप्त

घटनेनंतर नगरपरिषद कर्मचारी दीपक बारसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने प्रकाश कोळी यांच्या घरातून पाच कुत्री पकडून जप्त केली. या कारवाईवेळी परिसरात मोठ्या संख्येने संतप्त नागरिक जमले होते.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या

  • आक्रमक व धोकादायक मोकाट कुत्र्यांना तातडीने पकडून नियंत्रणात आणावे
  • नियमित श्वान नसबंदी मोहीम राबवावी
  • शहरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे
  • जबाबदार अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाबद्दल कारवाई करावी
  • भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात
या दुर्दैवी घटनेनंतर भुसावळ शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने आता तरी जागे होऊन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी होत आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या