“समाजाने एकजूट ठेवावी” : भुसावळातील जनजागृती सभेत पदाधिकाऱ्यांचे आवाहन
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने मेहतर वाल्मिकी समाज कृती समिती महाराष्ट्र राज्य आणि मातंग समाज संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती अभियान यात्रेला मंगळवार दि.१२ रोजी प्रारंभ झाला.
अभियानाचा शुभारंभ भुसावळ येथे आयोजित सभेद्वारे करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी मिथुन बारसे होते. यावेळी मेहतर वाल्मिकी व मातंग समाजातील महिला, पुरुष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात आरक्षण उपवर्गीकरण कृती समितीचे प्रदेशाध्यक्ष हरिश थंजे गुरुजी यांनी उपवर्गीकरणाबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी समाजातील हक्क, आरक्षणाची स्थिती आणि भविष्यातील संघर्ष याबाबत उपस्थितांना माहिती दिली.
यावेळी राज्य कार्यकारिणी महिला सदस्य सुषमा चव्हाण, नाशिक विभाग उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, जिल्हाध्यक्ष जितेंद्र बागरे तसेच लहूजी सेनेचे जिल्हाध्यक्षविकास वालकर यांनीही मार्गदर्शन केले. सभेत उपस्थित पदाधिका-यांनी अनुसूचित जातीतील काही प्रगत गटांच्या प्रभावापासून दूर राहण्याचे आवाहन करत, समाजाने एकजूट ठेवून आपल्या हक्कांसाठी लढा मजबूत करावा असे स्पष्ट केले. आरक्षण उपवर्गीकरणाचा कायदा होईपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. या अभियान यात्रेद्वारे समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचून जनजागृती करण्यावरभर देण्यात येणार असून ही यात्रा १६ तारखेपर्यंत विविध भागांत सुरू राहणार असल्याचे कृती समितीने सांगितले.
दरम्यान, भुसावळ येथील तरुण कार्यकर्ते मिथुन बारसे यांना आरक्षण कृती समिती महाराष्ट्र राज्याचे सदस्यत्व बहाल करण्यात आले. त्यांनी समाजसेवेसाठी काम करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जितेंद्र बागरे यांनी केले. सभेची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली.