भुसावळमध्ये गावठी पिस्टलसह आरोपी जेरबंद

बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाची कारवाई
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या डी.बी. पथकाने एका तरुणाला गावठी पिस्टल व जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक जळगाव श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या आदेशानुसार भुसावळ शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर लक्ष ठेवून कारवाई सुरू होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला.
पोलिसांना माहिती मिळाली होती की, शिरपूर-कन्हाळा रोडवरील घोडेपिर बाबा दर्गा परिसरात एक युवक गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा व जिवंत काडतुस घेऊन येणार आहे. त्यानुसार डी.बी. पथकाने परिसरात कारवाई करत अरसद अली शेख खालिद अली (वय 19, रा. आझाद नगर, बुरहानपूर, मध्यप्रदेश) याला ताब्यात घेतले.
त्याच्या अंगझडतीदरम्यान 40 हजार रुपये किंमतीचे लोखंडी गावठी पिस्टल मॅगझीनसह तसेच 1 हजार रुपये किंमतीचे एक जिवंत काडतुस असा एकूण 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीत आरोपीने सदर गावठी कट्टा हा मोहम्मद राजीक मोहम्मद आरिफ (रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ) याने ठेवण्यासाठी दिल्याची माहिती पोलिसांना दिली.
या प्रकरणी अरसद अली शेख खालिद अली आणि मोहम्मद राजीक मोहम्मद आरिफ या दोघांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 236/2026 अन्वये आर्म ॲक्ट कलम 3/25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलिस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, कांतीलाल केदारे तसेच पोलिस कॉन्स्टेबल जावेद शहा, दिलीप कोल्हे, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, जीवन कापडे, चंद्रकांत रायपुरकर आणि अक्षय कोतकर यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोहेकॉ कांतीलाल केदारे करीत आहेत.

