५० हजाराची लाच घेतांना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळयात

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – तक्रार अर्जाची चौकशी बंद करून पुढील कारवाई टाळण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नशिराबाद येथील मंडळ अधिकारी मिलिंद प्रकाश देवरे (वय ३७) आणि खासगी पंटर सुरेश प्रल्हाद अहिरे (वय ३९, विद्यानगर, पिंप्राळा, जळगाव) यांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली असून या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या शेतीमध्ये अवैधरित्या खोदकाम सुरू असल्याची तक्रार काही स्थानिक नागरिकांनी तहसील कार्यालयात केली होती. या तक्रारीच्या चौकशीची जबाबदारी मंडळ अधिकारी मिलिंद देवरे यांच्याकडे सोपविण्यात आली होती.चौकशीदरम्यान संबंधित तक्रार अर्ज बंद करून पुढील कारवाई न करण्यासाठी देवरे यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला सुमारे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. दरम्यान, तक्रारदाराविरोधातील अर्ज नंतर मागे घेण्यात आले होते. अखेर तडजोडीनंतर ५० हजार रुपये देण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार दाखल केली.१२ मे रोजी मंडळ अधिकारी देवरे यांनी तक्रारदारास लाचेची रक्कम खासगी व्यक्ती सुरेश अहिरे याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार पिंप्राळा येथील तलाठी कार्यालय परिसरात एसीबीच्या पथकाने पूर्वनियोजित सापळा रचत कारवाई केली आणि दोघांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
ही कारवाई नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रफुल्ल माळी, विलास निकम आदींच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे करीत आहेत.

