Sunday, May 17, 2026
Homeजळगावमुक्ताईनगरात सुस्थितीतील दुभाजक हटवण्यावरून वाद; ‘MSRDC’च्या रस्त्यावर ‘PWD’ची कारवाई चर्चेत

मुक्ताईनगरात सुस्थितीतील दुभाजक हटवण्यावरून वाद; ‘MSRDC’च्या रस्त्यावर ‘PWD’ची कारवाई चर्चेत

मुक्ताईनगरात सुस्थितीतील दुभाजक हटवण्यावरून वाद; ‘MSRDC’च्या रस्त्यावर ‘PWD’ची कारवाई चर्चेत

 

शासकीय निधीचा अपव्यय आणि नियमभंगाचा आरोप; चौकशीची मागणी

 

मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क— शहरातील बोदवड चौक ते प्रवर्तन चौक या प्रमुख मार्गावर सुरू असलेल्या दुभाजक हटवण्याच्या कामामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून (PWD) या रस्त्यावरील सुस्थितीतील दुभाजक तोडून नवीन दुभाजक उभारण्याचे काम हाती घेण्यात आले असून, या प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

 

स्थानिक नागरिकांच्या मते, संबंधित रस्ता हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) अखत्यारीत येतो. त्यामुळे कोणतेही बदल किंवा नवीन बांधकाम करण्यापूर्वी संबंधित विभागाची आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र, अशी कोणतीही पूर्वपरवानगी न घेताच काम सुरू करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

 

नागरिकांकडून निधी अपव्ययाचा आरोप

 

रस्त्यावरील विद्यमान दुभाजक चांगल्या स्थितीत असतानाही ते हटवण्याची आवश्यकता काय, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. “सुस्थितीतील दुभाजक तोडून पुन्हा नवीन बांधकाम करणे म्हणजे शासकीय निधीचा अनाठायी वापर,” अशी प्रतिक्रिया काही स्थानिकांनी व्यक्त केली आहे. तसेच या कामामागे कंत्राटी हितसंबंध तर नाहीत ना, अशीही चर्चा शहरात सुरू आहे.

 

चौकशीची मागणी

 

या प्रकरणाबाबत MSRDC नाशिक विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, संबंधित कामासाठी आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता घेण्यात आली होती का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

 

तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित नियमांचे पालन केले आहे का, याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. चौकशीअंती नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

“शासकीय प्रक्रियेचे उल्लंघन करून सुस्थितीतील मालमत्तेचे नुकसान होत असेल, तर ती गंभीर बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे,” अशी प्रतिक्रिया तक्रारदारांकडून देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या