भुसावळ तहसीलदारांकडून अवैध गौणखनिज वाहतूकदारांवर कारवाई

दोन वाहने जप्त; ४ लाख ४५ हजारांहून अधिक दंड वसूल
भुसावळ, खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ तहसील कार्यालयाच्या अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंधात्मक पथकाने अवैध वाळू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई केली. दि. २० मे २०२६ रोजी रात्री गस्तीदरम्यान दि. २१ मे रोजी पहाटे सुमारे १२.३० वाजेच्या सुमारास मौजे गोजोरा येथील मंदिराजवळ सुनसगाव–गोजोरा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली.
नीता लबडे, तहसीलदार भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने डंपर वाहन क्रमांक MH19CW882 मध्ये अंदाजे ५ ब्रास अवैध वाळू तसेच ट्रॅक्टर वाहन क्रमांक MH19AP7034 मध्ये १ ब्रास अवैध वाळू वाहतूक करताना पकडले.

वाहन चालकांकडे रितसर वैध परवाना व पावतीची विचारणा करण्यात आली असता कोणतेही अधिकृत कागदपत्र आढळून आले नाही. त्यामुळे पुढील दंडात्मक कारवाईसाठी दोन्ही वाहने जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आली.
या प्रकरणात डंपर वाहनावर ₹३,२१,१५०/- तर ट्रॅक्टर वाहनावर ₹१,२४,२३०/- असा एकूण ₹४,४५,३८०/- दंड आकारून वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई तहसीलदार नीता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख श्रीमती रजनी तायडे, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी श्रीमती साधना खुळे (गोजोरा), श्रीमती सुनिता वळवी, श्री गोपाळ भगत, श्री उमेश बाभुळकर, श्री रूपेश लिधोरकर, श्री प्रमोद ठोसर व श्री सुनील कचगुंडे यांनी संयुक्तरीत्या केली. या कारवाई मुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या व्यवसायिक धास्तावले आहेत .

