बोदवड अन्सारी खून प्रकरण : एपीआयसह दोन पोलिस कर्मचारी निलंबित जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केली कारवाई

बोदवड खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शहरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या अन्सार पिंजारी खून प्रकरणानंतर पोलिस प्रशासनाने मोठी कारवाई करत एका एपीआयसह दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिदायत नगर परिसरातील अन्सार शेखलाल पिंजारी (मन्सूरी) यांच्या घरात काही दिवसांपूर्वी चोरी झाली होती. या प्रकरणात त्यांनी अरबाज शाह याच्यावर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी त्याची चौकशी करून त्याला सोडून दिले. त्यानंतर आरोपीने अन्सार पिंजारी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती पोलिसांना होती, मात्र त्यावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नाही.
दरम्यान, बुधवारी 20 मे रोजी आरोपी अरबाज शाह याने धारदार चाकूने वार करून अन्सार पिंजारी यांची हत्या केली. या घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपीचे घर पेटवून दिले तसेच संबंधित पोलिसांवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली होती.
या गंभीर घटनेची दखल घेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली होती.
यानंतर झालेल्या चौकशीत बोदवड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर, एएसआय रवींद्र गुरचळ आणि हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कारवाई करत तिघांनाही निलंबित केले आहे.
चौकशीत असे समोर आले की, दोन्ही गटांतील वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाईची जबाबदारी हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांच्याकडे होती. मात्र त्यांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात न घेता आवश्यक कायदेशीर पावले उचलली नाहीत. तसेच टाऊन बीट प्रभारी एएसआय रवींद्र गुरचळ यांनीही 19 मे रोजी झालेल्या वादानंतर कठोर कारवाई न करता संबंधितांना सोडून दिल्याने परिस्थिती अधिक चिघळल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केदार बारबोले यांच्याकडे असून, त्यांच्या अहवालानंतरच ही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

