Friday, May 22, 2026
Homeगुन्हाबोदवड खून प्रकरणात मोठी कारवाई; एपीआयसह दोन पोलिस कर्मचारी निलंबित ! 

बोदवड खून प्रकरणात मोठी कारवाई; एपीआयसह दोन पोलिस कर्मचारी निलंबित ! 

धमकीची माहिती असूनही कारवाई नाही; कर्तव्यात हलगर्जीपणाचा ठपका !

बोदवड खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या अन्सार पिंजारी खून प्रकरणानंतर जिल्हा पोलिस प्रशासनाने मोठी कारवाई करत एका सहाय्यक पोलीस निरीक्षकासह (एपीआय) दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
खान्देश लाईव्ह न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार, हिदायत नगर परिसरातील अन्सार शेखलाल पिंजारी (मन्सूरी) यांच्या घरात काही दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली होती. या प्रकरणात त्यांनी अरबाज शाह याच्यावर संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी संशयिताची चौकशी करून त्याला सोडून दिले होते. त्यानंतर संबंधित आरोपीने अन्सार पिंजारी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती पोलिसांकडे उपलब्ध होती. मात्र, याप्रकरणी आवश्यक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.दरम्यान, २० मे रोजी आरोपी अरबाज शाह याने धारदार शस्त्राने वार करत अन्सार पिंजारी यांची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. संतप्त नागरिकांनी आरोपीचे घर पेटवून दिले तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली होती.
घटनेची गंभीर दखल घेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिल्याची चर्चा आहे. त्यानंतर वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश देण्यात आले.चौकशीत बोदवड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर, एएसआय रवींद्र गुरचळ आणि हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कारवाई करत तिघांनाही निलंबित केले आहे.
तपासादरम्यान असे स्पष्ट झाले की, दोन्ही गटांतील वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाईची जबाबदारी हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांच्याकडे होती. मात्र त्यांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात न घेता आवश्यक कायदेशीर पावले उचलली नाहीत. तसेच टाऊन बीट प्रभारी एएसआय रवींद्र गुरचळ यांनीही १९ मे रोजी झालेल्या वादानंतर कठोर कारवाई न करता संबंधितांना सोडून दिल्याने परिस्थिती अधिक चिघळल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केदार बारबोले यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यांच्या अहवालानंतरच संबंधित अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या