Friday, May 22, 2026
Homeगुन्हाएसीबीची मोठी कारवाई : दीड लाखांच्या लाचप्रकरणी अटकेत उपनिबंधकाच्या लॉकरमधून १.०७ कोटींचे...

एसीबीची मोठी कारवाई : दीड लाखांच्या लाचप्रकरणी अटकेत उपनिबंधकाच्या लॉकरमधून १.०७ कोटींचे घबाड जप्त ! 

लाचखोरी प्रकरणाने खळबळ : सोन्याचे दागिने, रोकड आणि चांदीचा मुद्देमाल हस्तगत

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी : दीड लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटकेत असलेल्या जळगाव सहकारी संस्थांचे उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी यांच्या लॉकरमधून तब्बल १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी भुसावळ येथील निवासस्थानासह कॉसमॉस बँकेतील लॉकरची झडती घेत ही मोठी कारवाई केली.
खान्देश लाईव्ह न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार असे की, तक्रारदाराविरुद्ध अवैध सावकारी संदर्भातील कारवाई सुरू होती. या प्रकरणाची सुनावणी जळगाव येथील उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात सुरू असताना, तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये तसेच चौकशी अहवाल अनुकूल पाठवण्यासाठी उपनिबंधक जगदीश बारी यांनी सुरुवातीला पाच लाख रुपयांची मागणी केली होती. चर्चेनंतर ही रक्कम तीन लाखांवर निश्चित करण्यात आली असून पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये स्वीकारण्याचे ठरले होते.
तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर २० मे रोजी सापळा रचण्यात आला. आरोपी देविदास धनसिंग पाटील याने जळगाव जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशन लिमिटेड, बी. जे. मार्केट, जळगाव येथे तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. त्यानंतर उपनिबंधक जगदीश बारी यांनाही अटक करण्यात आली.
 पुढील तपासादरम्यान एसीबीने भुसावळ येथील कॉसमॉस बँकेतील आरोपीच्या लॉकरची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात संपत्ती आढळून आली. या लॉकरमधून सुमारे ९९ लाख ४ हजार ९६० रुपयांचे सोन्याचे दागिने, ८ लाख ३६ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम तसेच चांदीचे दागिने असा एकूण १ कोटी ७ लाख ४४ हजार ७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईमुळे सहकार विभागात खळबळ उडाली असून एसीबीकडून आरोपीच्या मालमत्ता, आर्थिक व्यवहार आणि उत्पन्नाच्या स्रोतांची सखोल चौकशी सुरू आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या