Friday, May 22, 2026
Homeजळगावभुसावळात ओडीसा पोलिसांची धाड; ५ कोटींच्या खंडणी व खून प्रकरणातील संशयिताचा शोध

भुसावळात ओडीसा पोलिसांची धाड; ५ कोटींच्या खंडणी व खून प्रकरणातील संशयिताचा शोध

ओडीसा पोलिसांचे विशेष पथक थेट भुसावळात; खंडणी-खून प्रकरणातील आरोपीला भुसावळात आश्रय?

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी : शहर पोलीस स्टेशन हद्दीत ओडीसा राज्यातील खंडणी व खून प्रकरणातील एका संशयित आरोपीने आश्रय घेतल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ओडीसा पोलिसांचे विशेष पथक थेट भुसावळात दाखल झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित संशयितावर तब्बल ५ कोटी रुपयांच्या खंडणीसह खुनाचा गंभीर गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार असे की, ओडीसा पोलिसांनी शहरातील एका अपार्टमेंटवर छापा टाकून संबंधित अपार्टमेंट मालकाची कसून चौकशी केली. विशेष म्हणजे संबंधित अपार्टमेंट मालक हा एका नगरसेवकाचा पुतण्या असल्याची चर्चा शहरात सुरू असून, संशयित आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी माहिती असतानाही त्याला वास्तव्यास ठेवण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून संशयित आरोपीसाठी बनावट किंवा स्थानिक पत्त्यावर आधार कार्ड तयार करून देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पोलिस पथकाला अपार्टमेंटमधून संशयिताशी संबंधित आधार कार्ड मिळाल्याची चर्चा असून त्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.ओडीसा पोलिसांनी भुसावळ शहर पोलिसांच्या मदतीने अपार्टमेंट मालकाची दीर्घ चौकशी केली. “५ कोटींच्या खंडणी आणि खून प्रकरणातील संशयिताला नेमक्या कोणाच्या सांगण्यावरून आश्रय देण्यात आला?”, “यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का?” याबाबत आता विविध चर्चांना उधाण आले आहे.तपासादरम्यान संबंधित संशयित काही दिवसांपूर्वी सुरत येथे वास्तव्यास असल्याची माहिती अपार्टमेंट मालकाने पोलिसांना दिल्यानंतर ओडीसा पोलिसांचे विशेष पथक सुरतकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे.
या संपूर्ण कारवाईमुळे भुसावळ शहरात खळबळ उडाली असून, संशयिताचे स्थानिक संपर्क, आर्थिक व्यवहार आणि त्याला मदत करणाऱ्या व्यक्तींच्या भूमिकेचा तपास आता अधिक गतीने सुरू असल्याचे समजते.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या