नगरपालिकेची ‘ये रे माझ्या मागल्या’सारखी भूमिका? करदाते त्रस्त
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील भटके कुत्रे नियंत्रण, फिडींग स्पॉट्स आणि अन्न कचरा व्यवस्थापनाबाबत भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी नुकत्याच नागरिकांसाठी सक्तीच्या सूचना जारी केल्यानंतर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नागरिकांवर नियमांची सक्ती करण्यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने आवश्यक मूलभूत सुविधा आणि यंत्रणा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पुढे येत आहे.
फिडींग स्पॉट्स नाहीत, नियंत्रण पथक नाही; तरीही नागरिकांवर नियमांची सक्ती !
शहरातील उमेश कालिदास नेमाडे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “नगरपालिकेने घोषित फिडींग स्पॉट्स नेमके कुठे आहेत?”, “अन्न कचरा कुंड्या का उभारण्यात आलेल्या नाहीत?”, “भटके कुत्रे नियंत्रणासाठी स्वतंत्र पथक व वाहन कार्यान्वित का केले गेले नाही?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.नेमाडे यांच्या मते, शहरात नियमित ओला व सुका कचरा संकलन व्यवस्था प्रभावीपणे कार्यरत नसून अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचलेले दिसतात. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून भटक्या कुत्र्यांना खाद्य उपलब्ध होत आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ नुसार शहरातील नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासह मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची वैधानिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, प्रत्यक्षात आवश्यक यंत्रणा उभी न करता नागरिकांवरच नियम व कायद्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शहरातील दूषित पाणीपुरवठा, वाढता कचरा आणि भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास यामुळे करदाते नागरिक पूर्णतः असुरक्षित झाल्याचा दावा करत नेमाडे यांनी प्रशासनासमोर काही मागण्या देखील मांडल्या आहेत.यामध्ये १५ दिवसांत अधिकृत फिडींग स्पॉट्स जाहीर करणे, बंदिस्त अन्न कचरा कुंड्या उभारणे, नियमित कचरा संकलन व्यवस्था सुरू करणे, स्वतंत्र भटके कुत्रे नियंत्रण पथक कार्यान्वित करणे तसेच रेबिज प्रतिबंधक इंजेक्शन उपलब्धतेची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच शहरातील भटके कुत्रे व कचरा व्यवस्थापनाबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. अन्यथा महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ अंतर्गत सक्षम प्राधिकरणाकडे तक्रार दाखल करून कायदेशीर लढा देण्याचा इशाराही उमेश नेमाडे यांनी दिला आहे.