अनैतिक संबंधांना विरोध करणाऱ्या पत्नीचा खून; पतीला जन्मठेप!

पाचोरा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; २ लाखांची भरपाई देण्याचेही आदेश
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी- पतीचे जेठाणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याने पत्नीचा गळा व नाक-तोंड दाबून खून केल्याप्रकरणी पती चेतन दलेरसिंग राठोड याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. मोरवाले यांनी २३ नोव्हेंबर रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. तसेच मृत महिलेच्या मुलाला तीन महिन्यांच्या आत दोन लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.
पाचोरा तालुक्यातील गाळण शिवारातील शेतात चेतन राठोड हा कुटुंबासह राहत होता. त्याचे पत्नीच्या जेठाणीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मनीषा राठोड हिला मिळाली होती. या संबंधांना मनीषा विरोध करीत होती. याच कारणावरून तिचा सासरच्या मंडळींकडून छळ केला जात असल्याचे तपासात समोर आले होते. अखेर ४ फेब्रुवारी २०२२ रोजी मनीषाचा खून करण्यात आला होता.
या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे १२ साक्षीदार तपासण्यात आले. विशेष म्हणजे, खटल्यातील पंच फितूर झाले असतानाही सरकारी वकील अॅड. भारती खडसे यांनी सलग तीन दिवस प्रभावी युक्तिवाद केला.
मनीषाच्या शरीरावर हिंसाचाराच्या स्पष्ट खुणा नसतानाही वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव सोनार यांनी वैद्यकीय अहवालातून गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. आरोपीने छातीवर आणि नाक-तोंडावर हात ठेवून श्वास रोखल्याने तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय पुराव्यांतून पुढे आले.
सरकारी वकील अॅड. भारती खडसे यांनी विविध न्यायनिवाड्यांचे दाखले आणि भारतीय पुरावा कायद्यातील तरतुदींच्या आधारे गुन्हा सिद्ध केला. त्यानंतर न्यायालयाने चेतन राठोड याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. निकाल जाहीर होताच मृत मनीषाच्या भावाला अश्रू अनावर झाले.
या खटल्यात पैरवी अधिकारी राजेश भावसार आणि केस वॉच सुनील निकम यांनी सहकार्य केले.

