व्याजाच्या पैशांसाठी धमक्या; तरुणाची आत्महत्या, वडिलांचा गंभीर आरोप!

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील चौधरीवाडी परिसरात व्याजाने घेतलेल्या पैशांच्या वसुलीसाठी धमक्या दिल्यामुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अरबाज खान आसिफ खान (रा. संभाजीनगर) असे मृत तरुणाचे नाव असून, २२ नोव्हेंबर रोजी रात्री त्याने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले.
अरबाज हा ऑटोरिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याने २० हजार रुपये व्याजाने घेतले होते. मात्र, या रकमेच्या बदल्यात ४० हजार रुपये देण्याची मागणी करून त्याला धमकावले जात असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे.
या सततच्या त्रासाला कंटाळूनच मुलाने आत्महत्या केल्याचा दावा वडिलांनी फिर्यादीत केला आहे. याप्रकरणी ललित अशोक चौधरी (रा. घाटरोड, चाळीसगाव) याच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

