‘फिल्डिंग’ बहाद्दरांना एसपींचा झटका ! बदल्यांसाठी भेटींवर बंदी; कार्यालयाबाहेर झळकला कडक आदेश फलक
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – जिल्हा पोलिस दलातील पोलिस अंमलदारांच्या सर्वसाधारण व विनंती बदल्यांची प्रक्रिया नुकतीच नियमानुसार पूर्ण झाली आहे. मात्र, बदली आदेशानंतरही काही कर्मचाऱ्यांकडून पसंतीच्या ठिकाणी नियुक्ती मिळवण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ठोस भूमिका घेत बदल्यांसंदर्भातील कोणत्याही प्रकारच्या भेटींना स्पष्टपणे नकार दिला आहे.
याबाबतचा जाहीर आदेश १ जून रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयाबाहेर फलकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आला. आदेशानुसार, सन २०२६ मधील सर्वसाधारण तसेच विनंती बदल्यांचे कामकाज पूर्ण झाले असून, यापुढे बदल्यांसंदर्भात कोणत्याही पोलिस अंमलदाराने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.गेल्या काही दिवसांपासून काही कर्मचारी आपल्या बदलीत बदल करून घेण्यासाठी अथवा सोयीच्या ठिकाणी नियुक्ती मिळवण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्नशील असल्याची चर्चा होती. काहींकडून थेट भेटीगाठी व दबावतंत्राचाही अवलंब केला जात असल्याचे बोलले जात होते. या सर्व हालचालींना आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षकांनी हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
बदली प्रक्रियेत पारदर्शकता राखणे, अनावश्यक गर्दी टाळणे आणि वशिलेबाजीच्या प्रयत्नांना प्रतिबंध घालणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचे स्पष्ट होत आहे. पोलिस अधीक्षकांच्या या भूमिकेमुळे बदल्यांमध्ये फेरबदल करून घेण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये मात्र खळबळ उडाली आहे