अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; दोन डंपर जप्त !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – अवैध वाळू वाहतुकीविरोधात शहर व एमआयडीसी पोलिसांनी रविवारी (दि. 31 मे) स्वतंत्र कारवाया करत दोन डंपर जप्त केले. या दोन्ही प्रकरणांमध्ये संबंधित चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
पहिली कारवाई रविवारी पहाटे सुमारे 3 वाजता शहरातील चित्रा चौक परिसरात करण्यात आली. अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारा डंपर पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर तो अडवून ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी चालक चंदू इक्बाल शाह (वय 23, रा. खेडी, ता. जळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.दुसरी कारवाई एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या पथकाने तालुक्यातील विटनेर गावाजवळ रात्री उशिरा केली. परिसरातून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून वाळूने भरलेला डंपर जप्त केला. या प्रकरणी चालक हरिश गौतम सपकाळे (वय 28, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध गौण खनिज वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस प्रशासनाने कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर वाहतुकीविरोधात कठोर पावले उचलली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

