Wednesday, June 3, 2026
Homeगुन्हाअखेर भुसावळातील मुख्याध्यापकांचा घरफोडीचा छडा; १५ लाखांच्या सोन्याच्या चोरीप्रकरणी आंतरराज्यीय टोळी नागपुरातून...

अखेर भुसावळातील मुख्याध्यापकांचा घरफोडीचा छडा; १५ लाखांच्या सोन्याच्या चोरीप्रकरणी आंतरराज्यीय टोळी नागपुरातून जेरबंद !

अखेर भुसावळातील मुख्याध्यापकांचा घरफोडीचा छडा; १५ लाखांच्या सोन्याच्या चोरीप्रकरणी आंतरराज्यीय टोळी नागपुरातून जेरबंद !

 

नागपुरातून आंतरराज्यीय टोळी जेरबंद ; बिहार-हरियाणातील तीन आरोपी अटकेत, चोरीचा मुद्देमाल जप्त!

 

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील मिरची ग्राऊंड परिसरातील हुडको कॉलनीत भरदिवसा झालेल्या १५ लाख रुपयांच्या घरफोडीप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. अत्याधुनिक तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावत बिहार व हरियाणातील आंतरराज्यीय घरफोडी टोळीतील तीन आरोपींना नागपुरातून अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

भुसावळातील महाराणा प्रताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश शिंदे यांच्या हुडको कॉलनीतील निवासस्थानी ३१ मे रोजी दुपारच्या सुमारास ही धाडसी घरफोडी झाली होती. कुटुंबीय बाहेरगावी असताना शिंदे हे घराला कुलूप लावून अल्पकाळासाठी बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करून सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते.घटनास्थळी उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांची ओळख पटविण्यात आली. तपासादरम्यान आरोपी भुसावळ रेल्वे स्थानक परिसरातील बालाजी लॉजमध्ये वास्तव्यास असल्याचे समोर आले. पुढील तपासात त्यांचे लोकेशन नागपूरच्या गणेशपेठ परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करण्यात आली.या कारवाईत राजेश पारस शहा (वय ५२, बिहार), भोला उर्फ बिरेंदर सुखदेव पासवान (वय ४०, बिहार) आणि जसपालसिंग राजू (वय ४२, हरियाणा) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून चोरीतील सोन्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांच्याविरुद्ध नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत व भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. जळगाव गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल तसेच त्यांच्या पथकाने या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या टोळीने राज्यातील किंवा इतर राज्यांतील अशाच प्रकारच्या घरफोड्यांमध्ये सहभाग घेतला आहे का, याचा तपास आता पोलीस कोठडीत सखोलपणे केला जाणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या