Sunday, June 14, 2026
Homeगुन्हाबोरखेडा चार भावंडे हत्याकांड : नराधम महेंद्र बारेलाला फाशीची शिक्षा

बोरखेडा चार भावंडे हत्याकांड : नराधम महेंद्र बारेलाला फाशीची शिक्षा

बोरखेडा चार भावंडे हत्याकांड : नराधम महेंद्र बारेलाला फाशीची शिक्षा

 

विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला; जळगांव विशेष पोक्सो न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

 

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        दि. ४ जून जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणी आज न्यायालयाने ऐतिहासिक आणि कठोर असा निकाल देत आरोपी महेंद्र बारेला (वय २४) याला फाशीची शिक्षा सुनावली. जळगाव येथील विशेष फास्ट ट्रॅक पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. यादव यांनी हा निर्णय दिला. विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी मांडलेला प्रभावी युक्तिवाद, परिस्थितीजन्य पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे न्यायालयाने हा खटला “रेअरेस्ट ऑफ रेअर” अर्थात दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचे मान्य केले.

 

या निकालामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात समाधानाची भावना व्यक्त होत असून, पीडित कुटुंबाला अखेर न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

 

विश्वासघात, बलात्कार आणि चौपट हत्या

 

या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. घटनेच्या वेळी मृत बालकांचे आई-वडील मध्यप्रदेशातील खरगोन येथे मजुरीसाठी गेले होते. आरोपी महेंद्र बारेला हा मृत बालकांच्या मोठ्या भावाचा मित्र असल्याने त्याला घरात सहज प्रवेश मिळाला.

 

या विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने प्रथम घरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर गुन्हा उघडकीस येऊ नये यासाठी तिचा खून केला. एवढ्यावरच न थांबता त्याने घरातील इतर तीन लहान भावंडे (वय ११, ८ आणि ३ वर्षे) झोपेत असताना कुऱ्हाडीने सपासप वार करून त्यांचीही अत्यंत निर्दयीपणे हत्या केली.

 

स्वतःचा बचाव करण्याची संधीही न मिळालेल्या या चार निष्पाप बालकांच्या हत्येमुळे संपूर्ण समाजमन सुन्न झाले होते.

 

फाशीसाठी ॲड. उज्ज्वल निकम यांचे प्रभावी दहा मुद्दे

 

मंगळवारी आरोपीला दोषी ठरवल्यानंतर बुधवारी शिक्षेबाबत युक्तिवाद झाला. यावेळी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी फाशीच्या शिक्षेसाठी न्यायालयासमोर दहा महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.

 

त्यामध्ये चार निष्पाप बालकांची अमानुष हत्या, अल्पवयीन मुलीवरील बलात्कारानंतरचा खून, कोणतीही उकसवणी नसताना केलेले कृत्य, झोपेत असलेल्या मुलांवर हल्ला, कुऱ्हाडीचे अत्यंत क्रूर घाव, आरोपीमध्ये पश्चात्तापाचा पूर्ण अभाव, गुन्ह्यानंतरचे सामान्य वर्तन, समाजात निर्माण झालेली भीती, विश्वासघात आणि अशा गुन्हेगाराला दया दाखविणे समाजावरील अन्याय ठरेल, अशा मुद्द्यांचा समावेश होता.

 

निकम यांनी न्यायालयास सांगितले की, अशा प्रकारचे गुन्हे समाजाच्या अंतरात्म्याला हादरवणारे असून आरोपीस सुधारण्याची संधी देणे हे न्यायाच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात ठरेल.

 

शेक्सपिअरचा संदर्भ आणि संस्कृत उक्तीचा उल्लेख

 

युक्तिवादादरम्यान ॲड. निकम यांनी जागतिक कीर्तीचे साहित्यिक विल्यम शेक्सपिअर यांच्या ‘हॅम्लेट’ नाटकातील पात्रांचा संदर्भ देत आरोपीची विकृत मानसिकता स्पष्ट केली.

 

तसेच जळगाव कारागृह प्रशासन, मानसोपचार तज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार आरोपी मानसिकदृष्ट्या पूर्णपणे सामान्य असल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे मानसिक स्थितीच्या आधारावर कोणतीही सवलत देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

आरोपीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचे सांगताना त्यांनी संस्कृतमधील प्रसिद्ध उक्तीचा उल्लेख केला—

 

«”मन्त्रेण शाम्यते सर्पः, न खलः शाम्यते कदा”»

 

अर्थात, मंत्राने किंवा पुंगीच्या स्वराने साप शांत होऊ शकतो; परंतु दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तीचे मन बदलणे अशक्य असते.

 

फाशीच्या शिक्षेच्या समर्थनार्थ त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक ‘बच्चन सिंग विरुद्ध पंजाब राज्य’ प्रकरणाचा दाखला देत “रेअरेस्ट ऑफ रेअर” या तत्त्वाचा आधार घेतला.

 

२८ साक्षीदार आणि भक्कम परिस्थितीजन्य पुरावे

 

या खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. मात्र तत्कालीन रावेर पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी अत्यंत बारकाईने तपास करून पुरावे गोळा केले. पैरवी अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली.

 

सरकारी पक्षातर्फे एकूण २८ महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. घटनास्थळावरील वैज्ञानिक पुरावे, डीएनए अहवाल, वैद्यकीय निष्कर्ष, फॉरेन्सिक तपासणी, तांत्रिक पुरावे आणि विविध परिस्थितीजन्य बाबींची अखंड साखळी न्यायालयासमोर मांडण्यात आली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशन चे पो कॉ ज्ञानेश्वर चौधरी यांनी मोलाची कामगिरी बजावली .

 

या सर्व पुराव्यांच्या आधारे आरोपीचा गुन्ह्यातील सहभाग शंकातीतपणे सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले.

 

कुटुंबाला मिळाला न्याय

 

मंगळवारी न्यायालयाने आरोपी महेंद्र बारेला याला दोषी ठरविले होते. त्यानंतर आज शिक्षेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावत या बहुचर्चित खटल्यावर शिक्कामोर्तब केले.

 

चार निष्पाप बालकांच्या हत्येमुळे हादरलेल्या समाजाला आणि पीडित कुटुंबाला या निकालामुळे दिलासा मिळाला असून, न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

 

या ऐतिहासिक निर्णयामुळे बालकांविरुद्धचे गंभीर गुन्हे आणि स्त्रियांवरील अत्याचार प्रकरणांमध्ये कठोर शिक्षेचा स्पष्ट संदेश समाजापर्यंत पोहोचल्याचे मानले जात आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या