Sunday, June 7, 2026
Homeगुन्हाशेतकऱ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई; अवैध एचटीबीटी बियाणे प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ! 

शेतकऱ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई; अवैध एचटीबीटी बियाणे प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ! 

शेतकऱ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई; अवैध एचटीबीटी बियाणे प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ!

जामनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जामनेर तालुक्यात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या अवैध विक्रीप्रकरणी कृषी विभागाने मोठी कारवाई करत १ हजार १६ बियाणे पाकिटे जप्त केली आहेत. या प्रकरणी चार जणांविरुद्ध जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी विभागाने ३ जून रोजी पाठविलेल्या डमी ग्राहकास १ हजार संशयास्पद कापूस बियाणे पाकिटांची प्रत्येकी १,२०० रुपयांप्रमाणे विक्री करण्याचा व्यवहार पिंप्री (ता. धरणगाव) येथे गुलाब आधार पाटील, भूषण पाटील आणि दीपक राजकमल चौधरी यांनी ठरविला होता. मात्र, व्यवहार अंतिम टप्प्यात असताना पोलिसांची पाळत असल्याचा संशय आल्याने संबंधितांनी बियाण्यांची विक्री न करता तेथून पलायन केले.यानंतर कृषी विभागाने स्थानिक गुन्हा शाखेच्या मदतीने तांत्रिक तपास सुरू केला. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जामनेर येथील दीपक राजकमल चौधरी यांच्या निवासस्थानी झडती घेण्यात आली. या कारवाईत एकूण १,०१६ संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे पाकिटे आढळून आली असून ती जप्त करण्यात आली.जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांमध्ये एचटीबीटी जनुक व बीटी प्रोटीनची उपस्थिती तपासण्यासाठी पंचासमक्ष नमुने घेऊन प्रयोगशाळा विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. तपासादरम्यान प्राप्त जबाब आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधित बियाणे कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी तुकाराम कोळी यांनादेखील सहआरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या चार झाली आहे.
सदर कारवाई व तपास परीविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आला. कृषी विभागाचे गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राजेंद्र हेपले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना अनधिकृत, अप्रमाणित किंवा संशयास्पद कापूस बियाणे खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी केवळ अधिकृत परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे, असेही विभागाने स्पष्ट केले आहे
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या