ग्राहक बनून आले अन् साडेसहा लाखांचे सोने घेऊन पसार!

सीसीटीव्हीत कैद झाला सोन्याच्या पेंडल चोरीचा थरार !
चोपडा खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील मेन रोडवरील गोल्ड हाऊस महावीर ब्रदर्स या सराफा दुकानातून तब्बल ६ लाख ४८ हजार रुपयांचे ८१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे लेडीज पेंडल चोरीस गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ग्राहक बनून दुकानात आलेल्या तिघा अज्ञात व्यक्तींनी कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करून हातचलाखीने सोन्याचे पेंडल लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जून रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजेच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्ती गोल्ड हाऊस महावीर ब्रदर्स या दुकानात आले. त्यांनी विविध प्रकारचे सोन्याचे दागिने पाहण्याच्या बहाण्याने कर्मचाऱ्याकडून अनेक डिझाईनचे पेंडल मागवून घेतले. यावेळी त्यांनी मुद्दाम गोंधळाचे वातावरण निर्माण करून कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित केले.संशयित दुकानातून निघून गेल्यानंतर पेंडलच्या बॉक्सची तपासणी करण्यात आली असता वजनात तफावत आढळून आली. पुढील पडताळणीत १५ प्लास्टिक पाकिटांपैकी एक पाकीट गायब असल्याचे निदर्शनास आले. चोरीस गेलेल्या पाकिटात प्रत्येकी सुमारे ३ ग्रॅम वजनाचे एकूण २१ लेडीज पेंडल असून त्यांचे एकूण वजन ८१ ग्रॅम असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी दुकान मालक महावीर उमेदमल जैन यांनी चोपडा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करीत आहेत.

