महामार्गावर चाकूचा धाक दाखवत लुटमार; चार सराईत आरोपी दोन तासांत जेरबंद

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – मध्यरात्री हॉटेल बंद करून घरी परतणाऱ्या हॉटेल व्यवस्थापकासह रस्त्याने जाणाऱ्या अन्य तिघांना चाकूचा धाक दाखवत मारहाण करून त्यांच्याकडील एकूण ७ हजार ८०० रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची धक्कादायक घटना ११ जून रोजी पहाटे महामार्गावर घडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जळगाव तालुका पोलिसांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवित पोलिसांच्या रेकॉर्डवरील चार सराईत आरोपींना अवघ्या दोन तासांत अटक केली.
बांभोरी येथील हॉटेल व्यवस्थापक चेतन प्रकाश पाटील यांना चाकूचा धाक दाखवून मारहाण करत त्यांच्याकडील रोकड लुटण्यात आली. त्यानंतर पहाटेच्या सुमारास अन्य तिघांनाही लक्ष्य करत त्यांच्याकडील रोकड जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चेतन उर्फ बटाटा रमेश सुशिर, उमाकांत दत्तात्रय जाधव, गौरव संजय जाधव आणि रोशन भगवान पाटील यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने ही कारवाई केली असून पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे करीत आहेत.

