Tuesday, June 16, 2026
Homeजळगावभुसावळ हादरलं! गजबजलेल्या शिव कॉलनीत सलग चार घरफोड्या

भुसावळ हादरलं! गजबजलेल्या शिव कॉलनीत सलग चार घरफोड्या

भुसावळ हादरलं! गजबजलेल्या शिव कॉलनीत सलग चार घरफोड्या

 

 

शिव कॉलनीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; चार बंद घरांवर धाडसी घरफोडी

 

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील पु. ओ. नाहाटा महाविद्यालयाजवळील गजबजलेल्या शिव कॉलनी परिसरात सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी घरफोड्यांची मालिका घडवत चार बंद घरांना लक्ष्य केले. यापैकी एका घरातून सुमारे ७० हजार रुपयांची रोकड आणि २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले, तर उर्वरित तीन घरांमधून चोरट्यांच्या हाती फारसा ऐवज लागला नसल्याची माहिती समोर आली आहे.

 

जामनेर रोडवरील शिव कॉलनीत वास्तव्यास असलेले प्रमोद भास्कर भंगाळे हे जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव येथे रिव्ह्यू ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत. ते पत्नी मंगला भंगाळे यांच्यासह पंढरपूर दर्शनासाठी गेल्याने घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सुमारे ७० हजारांची रोकड तसेच चार सोन्याच्या अंगठ्या, एक अतिरिक्त अंगठी आणि पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे नाणे असा एकूण २८ ग्रॅम सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.सोमवारी सकाळी शेजाऱ्यांनी प्रांगणातील वर्तमानपत्र घेण्यासाठी गेल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले दिसल्याने घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर बाजारपेठ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

 

दरम्यान, भंगाळे यांच्या घराजवळील दुसऱ्या गल्लीतही चोरट्यांनी आणखी तीन घरांचे कुलूप तोडून घरफोडीचा प्रयत्न केला. पंढरीनाथ महादू पाटील, अमोल गिरी तसेच सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागातील कर्मचारी अच्युत मायानगरी यांच्या घरात प्रवेश करून सामान अस्ताव्यस्त करण्यात आले. मात्र, घरात मौल्यवान वस्तू नसल्याने चोरट्यांच्या हाती काहीही लागले नाही.

 

बाजारपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक महेश गायकवाड, डीबी शाखेचे हवालदार विजय नेरकर आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तक्रारदार आल्यानंतर डॉग स्कॉड व ठसे तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यातून महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.शहरात वाढत्या चोऱ्या व घरफोड्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या