दुकान लावण्याच्या वादातून तरुणाची विटेने ठेचून हत्या एकावर खुनाचा गुन्हा

<img class

चाळीसगावातील मांगारवाडी परिसरातील घटना वडिलांच्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल
चाळीसगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी शहरातील लक्ष्मीनगर येथील २७ वर्षीय तरुणाची दुकान लावण्याच्या जुन्या वादातून विटेने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मयत तरुणाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात निखील उर्फ भोला सुनील अजबे (रा. लक्ष्मीनगर, चाळीसगाव) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय भानुदास पाटील (वय २७) हा वडील भानुदास पाटील यांच्यासोबत मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. बसस्थानकाच्या परिसरात दुकान लावण्याच्या कारणावरून अक्षय आणि निखील उर्फ भोला अजबे यांच्यात यापूर्वीही वारंवार वाद होत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे १८ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास जेवण झाल्यानंतर निखील अजबेने बोलावल्याचे सांगून अक्षय घरातून बाहेर पडला. वडिलांनी त्याला जाण्यास मनाई केली होती. मात्र, तो घराबाहेर गेला आणि रात्री उशिरापर्यंत परतला नाही. शोध घेऊनही तो न सापडल्याने कुटुंबीय घरी परतले.दरम्यान, १९ जून रोजी पहाटे पोलिसांनी अक्षयला मारहाण झाल्याची माहिती दिल्यानंतर कुटुंबीय ग्रामीण रुग्णालयात पोहोचले. तेथे डॉक्टरांनी तपासणी करून अक्षयचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. त्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर गंभीर मारहाणीच्या जखमा असल्याचे दिसून आले.त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी नेल्यानंतर मांगारवाडी परिसरातील एका पडिक घरासमोर रक्ताचे थारोळे आणि रक्ताने माखलेल्या विटांचे तुकडे आढळून आले. त्यावरून दुकान लावण्याच्या वादातून संशयिताने विटेने डोक्यावर व चेहऱ्यावर वार करून अक्षयची हत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.या प्रकरणी मयताचे वडील भानुदास राजाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात संशयित निखील उर्फ भोला सुनील अजबे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे

