Saturday, July 4, 2026
Homeगुन्हाभुसावळात पुन्हा मर्डर! चार दिवसांत दुसरी हत्या; रेल्वे फिल्टर हाऊसमधील कर्मचाऱ्याचा लोखंडी...

भुसावळात पुन्हा मर्डर! चार दिवसांत दुसरी हत्या; रेल्वे फिल्टर हाऊसमधील कर्मचाऱ्याचा लोखंडी पट्टीने खून

भुसावळातील गुन्हेगारीचा पुन्हा उद्रेक; चार दिवसांत दुसरी खूनाची घटना !

रेल्वे भंगार वाद पुन्हा केंद्रस्थानी; भुसावळात ५८ वर्षीय कर्मचाऱ्याचा निर्घृण खून !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरातील आरपीडी रोडवरील मिलिटरी डेपोमागील कालिका मंदिराची स्वच्छता करणाऱ्या 55 वर्षीय सेवेकऱ्याच्या हत्येची घटना ताजी असतानाच भुसावळात पुन्हा एकदा खुनाची थरारक घटना घडली आहे. शहरातील कवाडे नगराजवळील रेल्वे फिल्टर हाऊसमध्ये काम करणाऱ्या 58 वर्षीय कर्मचाऱ्याची डोक्यात लोखंडी पट्टी मारून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. 4) रात्री उशिरा उघडकीस आली. सलग चार दिवसांच्या अंतराने शहरात घडलेल्या दुसऱ्या हत्येमुळे भुसावळसह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून शहरातील वाढत्या गुन्हेगारीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
खून झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव प्रसाद यशवंत कुलकर्णी(वय 58, स्टार लॉन, भारंबे नगर, भुसावळ) असे आहे. या प्रकरणी आकाश भानुदास गोरखा (रा. कवाडे नगर, भुसावळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कवाडे नगर परिसरातील रेल्वे फिल्टर हाऊसमध्ये प्रसाद कुलकर्णी हे शनिवारी सायंकाळी कर्तव्यावर होते. याचदरम्यान रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास संशयित आकाश गोरखा हा तेथे आला. काही कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर संतापाच्या भरात त्याने फिल्टर हाऊसमध्ये पडलेली लोखंडी पट्टी उचलून कुलकर्णी यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. हा घाव गंभीर ठरल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन कुलकर्णी यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपअधीक्षक केदार बारबोले, शहर पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून जळगाव येथून फॉरेन्सिक तज्ज्ञ व ठसे तज्ज्ञांना तपासासाठी पाचारण करण्यात आले आहे, ताब्यात घेण्यात आलेला संशयित आरोपी मनोरुग्ण असून त्याच्यावर ठाण्यात उपचार सुरू आहेत. त्याच्याविरुद्ध यापूर्वी दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र 2021 नंतर त्याच्याविरुद्ध कोणताही नवीन गुन्हा दाखल झालेला नसल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, भुसावळात अवघ्या चार दिवसांच्या अंतराने घडलेल्या दोन हत्यांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही हत्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे भंगाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रेल्वेचा विस्तीर्ण आणि अनेक ठिकाणी निर्जन परिसर, अपुरी गस्त आणि भंगार चोरीच्या वाढत्या घटनांमुळे असामाजिक घटकांना संधी मिळत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. भंगार चोरी, त्याची बेकायदा खरेदी-विक्री आणि त्यातून निर्माण होणारे वाद यामुळे गंभीर गुन्ह्यांना खतपाणी मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रेल्वे भंगार चोरीसह बेकायदा भंगार खरेदी करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. सलग घडणाऱ्या खुनांच्या घटनांमुळे भुसावळकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या