कन्हाळे बु : गावात गावठी दारू विक्रीचा सुळसुळाट .

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील कन्हाळे बुद्रुक हे गाव शिक्षण, शेती आणि सामाजिक सलोखा यासाठी ओळखले जातेमात्र गावात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या कथित गावठी दारू विक्रीमुळे गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, बाहेरील अनेक व्यक्ती दारू पिण्यासाठी गावात येत असल्याने गावाचे सामाजिक वातावरण बिघडत आहे. विशेषतः शाळा आणि शिकवणीसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
एक जागरूक नागरिक म्हणून ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष या गंभीर समस्येकडे वेधले आहे. विद्यार्थ्यांची ये-जा असलेल्या परिसरात दारूचे अड्डे सुरू असल्यास त्याचा विपरीत परिणाम मुलांच्या मानसिकतेवर तसेच त्यांच्या सुरक्षिततेवर होऊ शकतो. गावातील पालक आणि नागरिकांमध्ये याबाबत नाराजी वाढत असल्याचे सांगितले जात आहे.
गावकऱ्यांचा प्रश्न असा आहे की, जर गावात एवढ्या मोठ्या प्रमाणावर गावठी दारूची विक्री होत असेल तर संबंधित यंत्रणांना याची माहिती आहे का? या अवैध व्यवसायाला नेमके कोणाचे संरक्षण मिळत आहे? तसेच अशा प्रकारच्या बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ग्रामस्थांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य, महिलांची सुरक्षितता आणि गावाचे सामाजिक वातावरण जपण्यासाठी अवैध दारू विक्रीवर आळा घालणे अत्यावश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे .

