Sunday, June 28, 2026
Homeभुसावळशासकीय तिजोरीवर डल्ला! भुसावळच्या लिपिकाने ८६ लाखांचा आर्थिक अपहार केल्याचा आरोप

शासकीय तिजोरीवर डल्ला! भुसावळच्या लिपिकाने ८६ लाखांचा आर्थिक अपहार केल्याचा आरोप

मृद व जलसंधारण उपविभागात ८६ लाखांचा आर्थिक अपहार; ‘सेवार्थ’ प्रणालीत फेरफार करून वरिष्ठ लिपिकाचा कारनामा उघड!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शासकीय वेतन प्रणालीचा गैरवापर करत ‘सेवार्थ’ प्रणालीत फेरफार करून तब्बल ८६ लाख ८ हजार ६४३ रुपयांचा आर्थिक अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार भुसावळ येथील मृद व जलसंधारण उपविभागात उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून संबंधित वरिष्ठ लिपिकाविरुद्ध भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील संशयित तनुज रवींद्र सैंदाणे (वय ३५, रा. पवन हिल्स, जळगाव) हा मृद व जलसंधारण उपविभागात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होता. कार्यालयातील कर्मचाऱ्यांची वेतन बिले तयार करणे, पूरक देयके सादर करणे तसेच कोषागाराशी संबंधित कामकाजाची जबाबदारी त्याच्याकडे होती.तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२१ ते मार्च २०२६ या कालावधीत संशयिताने ‘सेवार्थ’ प्रणालीत स्वतःच्या मूळ वेतनासह विविध भत्त्यांमध्ये नियमबाह्य वाढ करून बनावट वेतन बिले तयार केली. ही बिले खरी असल्याचा भास निर्माण करून ती आहरण व संवितरण अधिकारी यांच्या स्वाक्षरीसाठी सादर करण्यात आली. त्यानंतर कोषागार कार्यालयातून ती मंजूर करून ७० लाख ३८ हजार ३७ रुपये स्वतःच्या बँक खात्यात वर्ग करून घेतल्याचा आरोप आहे.याशिवाय, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (NPS) तसेच इतर कपातीच्या रकमांमध्येही फेरफार करून १५ लाख ७० हजार ६०६ रुपये स्वतःच्या निवृत्तीवेतन खात्यात जमा केल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शासनाची एकूण ८६ लाख ८ हजार ६४३ रुपयांची आर्थिक फसवणूक व अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी उपअभियंता निनाद विवेक रत्नपारखी (वय ३२, रा. आदर्श नगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २५ जून रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात संबंधित वरिष्ठ लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेनंतर शासकीय कार्यालयांतील आर्थिक व्यवहार, ‘सेवार्थ’ प्रणालीवरील नियंत्रण आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, या अपहारात आणखी कोणी सहभागी आहे का? पोलीस तपास सुरू आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या