भुसावळ हादरले! मंदिरातील मुख्य पुजाऱ्याची निर्घृण हत्या; अज्ञात मारेकऱ्यांचा शोध सुरू
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शहरालगत झेडटीआरआय बोगद्यानजीक असलेल्या मंदिरातील मुख्य पुजाऱ्याची अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २९) सकाळी उघडकीस आली. या खळबळजनक घटनेमुळे भुसावळ शहरासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष रघुवीर मंचल (वय ५५, रा. झेडटीआरआय परिसर, भुसावळ) असे मृत पुजाऱ्याचे नाव आहे. ते आरपीडी मार्गालगत लष्करी डेपोपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील तीन मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून नियमित पूजा-अर्चा करत होते. शांत, संयमी आणि धार्मिक वृत्तीमुळे परिसरात त्यांना मानाचे स्थान होते.सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे कुटुंबीय मंदिरात गेले असता संतोष मंचल हे मंदिर परिसरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्यावर जड वस्तूने वार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. कुटुंबीयांनी तातडीने परिसरातील नागरिकांना पाचारण केले तसेच पोलिसांना घटनेची माहिती दिली.माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.
या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. चोरीच्या उद्देशाने, वैयक्तिक वैमनस्यातून अथवा अन्य कोणत्या कारणामुळे ही हत्या करण्यात आली, याचा सर्व अंगांनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी ठसेतज्ज्ञ व फॉरेन्सिक पथकाने तपासणी करून महत्त्वाचे पुरावे व नमुने संकलित केले आहेत, संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके नियुक्त केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती तसेच स्थानिक नागरिकांची चौकशी सुरू आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यासाठी विविध दिशांनी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
या निर्घृण हत्येमुळे भुसावळ शहरासह संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.