आषाढी यात्रेसाठी खुशखबर! भुसावळ, जळगावमार्गे पंढरपूरसाठी चार विशेष रेल्वेगाड्या

जळगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकरी आणि भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने चार विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे जळगाव, भुसावळ, पाचोरा, चाळीसगाव, मनमाडसह खान्देश, विदर्भ आणि मराठवाड्यातील भाविकांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
यंदा नागपूर–मिरज, नवी अमरावती–पंढरपूर, खामगाव–पंढरपूर आणि भुसावळ–पंढरपूर या मार्गांवर विशेष गाड्या धावणार असून, सर्व गाड्यांना भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड आदी महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
नागपूर–मिरज विशेष (०१२०५/०१२०६)
गाडी क्रमांक ०१२०५ ही विशेष गाडी २३ व २४ जुलै रोजी सकाळी ८.५० वाजता नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी ११.५५ वाजता मिरजला पोहोचेल. परतीची ०१२०६ गाडी २४ व २५ जुलै रोजी दुपारी १२.५५ वाजता मिरजहून सुटून दुसऱ्या दिवशी १२.२५ वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीत २ वातानुकूलित तृतीय श्रेणी, १० शयनयान आणि ४ सामान्य द्वितीय श्रेणी डबे असतील.
नवी अमरावती–पंढरपूर विशेष (०१११९/०११२०)
०१११९ ही गाडी २१ व २४ जुलै रोजी दुपारी २.४० वाजता नवी अमरावतीहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.१० वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीची ०११२० गाडी २२ व २५ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता पंढरपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२.५० वाजता नवी अमरावतीला पोहोचेल. या गाडीत २ एसी, १० शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ गार्ड ब्रेकव्हॅन असतील.
खामगाव–पंढरपूर विशेष (०११२१/०११२२)
०११२१ ही गाडी २१ व २३ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजता खामगावहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीची ०११२२ गाडी २२ व २४ जुलै रोजी पहाटे ५ वाजता पंढरपूरहून सुटून त्याच दिवशी सायंकाळी ७.३० वाजता खामगावला पोहोचेल. या गाडीत एकूण १६ डबे असतील.
भुसावळ–पंढरपूर अनारक्षित विशेष (०११५९/०११६०)
कमी खर्चात प्रवास करणाऱ्या भाविकांसाठी भुसावळ–पंढरपूर अनारक्षित विशेष गाडीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. २४ व २५ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता ही गाडी भुसावळहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता पंढरपूरला पोहोचेल. परतीची ०११६० गाडी २५ व २६ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता पंढरपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता भुसावळला पोहोचेल. या गाडीत सर्व १६ अनारक्षित डबे असतील.
रेल्वे प्रशासनाने भाविकांना प्रवासाचे नियोजन करून तिकीट आरक्षण वेळेत करण्याचे आवाहन केले आहे. या विशेष रेल्वेगाड्यांमुळे आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या हजारो वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी होणार आहे.

