जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्साहात प्रारंभआमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस; ‘० ते ५ वर्षांतील एकही बालक वंचित राहू नये’ – महापौर दीपमाला काळे

जळगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान २०२६ अंतर्गत जळगाव शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे रविवारी (२८ जून) शहरात पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. धन्वंतरी देवतेचे पूजन करून मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते बालकांना पोलिओ प्रतिबंधक डोस पाजून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार राजूमामा भोळे यांनी माता व बालकांच्या आरोग्याबाबत अधिक संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहन करत, “प्रत्येक बालकाचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांनी यासाठी विशेष दक्षता घ्यावी,” असे सांगितले.
महापौर दीपमाला काळे यांनी शहरातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस मिळणे अत्यावश्यक असल्याचे सांगत, पालकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. “३० जूनपासून आरोग्य विभागाच्या पथकांकडून घरोघरी जाऊन लसीकरण करण्यात येणार असून नागरिकांनी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे,” असेही त्या म्हणाल्या.
या कार्यक्रमाला उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती सिंधुताई कोल्हे, आरोग्य विभागाचे उपसंचालक दिलीप सौंदळे, नगरसेवक दीपक सूर्यवंशी तसेच राष्ट्रीय हिवताप अभियानाचे अधिकारी के. बी. नगराळे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत निकुंभ, डॉ. राम रावलानी, डॉ. स्वप्नील सोनवणे, इन्चार्ज परिचारिका प्रिया सूर्यवंशी आणि महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

