भुसावळ विभागात मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू; नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष सघन मतदार यादी पुनर्निरीक्षण (Special Intensive Revision – SIR 2026) कार्यक्रमाला भुसावळ विभागात प्रारंभ झाला असून, सर्व पात्र मतदारांनी या मोहिमेला सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन भुसावळचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
या विशेष मोहिमेअंतर्गत ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बूथ लेव्हल अधिकारी नागरिकांच्या घरी भेट देऊन गणना प्रपत्र वाटप करणार आहेत. फॉर्म भरून घेणे, आवश्यक कागदपत्रे तपासणे, माहिती BLO App मध्ये अद्ययावत करणे आणि अर्ज ईआरओ कार्यालयात जमा करणे ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
मतदारांच्या घरांना प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संकलित केली जाणार असून, घरी कोणी नसल्यास फॉर्म ठेवला जाईल आणि त्यासाठी तीन वेळा भेट दिल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्यास पंचनामा करण्यात येईल. स्थलांतरित, मयत किंवा दुबार मतदारांची स्वतंत्र नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे. नवीन मतदारांची नोंदणी तसेच नाव, पत्ता किंवा इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठीही अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
प्रत्येक बुथ अधिकारी यांना सुमारे १,४०० मतदारांची जबाबदारी देण्यात आली असून, दररोज किमान ५० फॉर्मचे वितरण व संकलन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामासाठी पर्यवेक्षक, सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर तसेच NSS, NCC स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे. सर्व कामकाजाची दैनंदिन नोंद ठेवण्यासाठी स्वतंत्र नोंदवह्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
५ ऑगस्टला प्रारूप मतदार यादी
संकलित माहितीच्या आधारे ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत नागरिकांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. प्राप्त अर्जांवर सुनावणी घेऊन अंतिम निर्णय झाल्यानंतर सुधारित मतदार यादी तयार करण्यात येईल.
भुसावळ विधानसभा मतदारसंघाची स्थिती
भुसावळ विधानसभा मतदारसंघात १ जानेवारी २०२६ रोजी एकूण ३ लाख १८ हजार ८३४ मतदार होते. त्यापैकी स्थलांतरित, दुबार व मयत अशा ३४ हजार ७७० मतदारांची वगळणी करण्यात आली असून, २२ जून २०२६ रोजी मतदारांची संख्या २ लाख ८४ हजार ६४ इतकी आहे.
यापैकी २ लाख ३१ हजार १७६ मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून ५२ हजार ८८८ मतदारांचे मॅपिंग अद्याप बाकी आहे. मॅपिंगची टक्केवारी ८१.३८ टक्के आहे. मतदार यादीत ४० हजार २४३ विसंगती (Anomalies) आढळल्या असून ५ हजार २५५ ब्लर फोटो असलेल्या मतदारांचे फोटो फॉर्म क्रमांक ८ द्वारे अद्ययावत करण्यात आले आहेत. तसेच १३ हजार ८९० दुबार मतदारांची वगळणी करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी नागरिकांना वेळेत Enumeration Form भरून आवश्यक कागदपत्रांसह BLO कडे जमा करण्याचे आवाहन केले असून, अचूक व अद्ययावत मतदार यादी तयार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

