Thursday, July 2, 2026
Homeयावलग्रामपंचायतीतील ग्रामसेवकावर जिल्हा परिषदेकडून कारवाई; CEO करिष्मा नायर यांचा कठोर निर्णय!

ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकावर जिल्हा परिषदेकडून कारवाई; CEO करिष्मा नायर यांचा कठोर निर्णय!

ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकावर जिल्हा परिषदेकडून कारवाई; CEO करिष्मा नायर यांचा कठोर निर्णय!

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – यावल तालुक्यातील मालोद ग्रामपंचायतीत पेसा अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या विजय गंगाराम बारेला यांची सेवा अखेर समाप्त करण्यात आली असून त्यांची नियुक्तीही रद्द करण्यात आली आहे. असमाधानकारक कामकाज, हलगर्जीपणा, टाळाटाळ आणि गैरवर्तणुकीच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या कारवाईमुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात आणि ग्रामीण भागात मोठी खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद जळगावच्या ग्रामपंचायत विभागाकडून विजय गंगाराम बारेला यांची पेसा अंतर्गत कंत्राटी ग्रामसेवक पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांची मालोद ग्रामपंचायतीत पदस्थापना करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या कामकाजाबाबत ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी वारंवार असमाधान व्यक्त करत जिल्हा परिषदेकडे तक्रारी दाखल केल्या होत्या.
या तक्रारींच्या अनुषंगाने बारेला यांना २३ जानेवारी २०२६ रोजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत), जिल्हा परिषद जळगाव यांच्या कार्यालयात सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार सुनावणी घेण्यात आली आणि त्यानंतर संबंधित स्तरावर निर्णयही नोंदविण्यात आला. दरम्यान, गट विकास अधिकारी, पंचायत समिती यावल यांनीही बारेला यांच्या कामकाजाबाबत स्वतंत्र अहवाल सादर केला होता.सुनावणीनंतरही बारेला यांच्या कामकाजात अपेक्षित सुधारणा दिसून आली नाही. उलट, सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी पुन्हा त्यांच्या असमाधानकारक कामकाज व गैरवर्तणुकीबाबत तक्रार अर्ज सादर केले. तसेच गट विकास अधिकारी, पंचायत समिती यावल यांनीही त्यांच्या कामकाजातील त्रुटींविषयी अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविला.
संबंधित सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर बारेला हे कामकाजात अक्षम्य दुर्लक्ष, टाळाटाळ, हलगर्जीपणा तसेच शासकीय कामकाजात गैरवर्तणूक करीत असल्याचे स्पष्ट झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.नियुक्ती आदेशातील अट क्रमांक १४ नुसार, नियुक्तीच्या कालावधीत उमेदवाराने कोणत्याही स्वरूपाची गैरवर्तणूक केल्यास त्याची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल, अशी स्पष्ट तरतूद आहे. त्यानुसार बारेला यांना सेवा समाप्तीची नोटीस बजावून सात दिवसांच्या आत खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले होते. गट विकास अधिकारी, पंचायत समिती यावल यांनी २ जून २०२६ रोजी त्यांना नोटीस बजावली होती. मात्र, निर्धारित मुदतीत बारेला यांनी कोणताही खुलासा सादर केला नाही.
या सर्व बाबींचा विचार करून विजय गंगाराम बारेला, कंत्राटी ग्रामसेवक, ग्रामपंचायत मालोद यांची कंत्राटी ग्रामसेवक पदावरील नियुक्ती तत्काळ प्रभावाने रद्द करण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. संबंधित सर्व अधिकाऱ्यांना या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.या निर्णयामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात आणि विशेषतः ग्रामीण भागात मोठी चर्चा सुरू झाली असून, कर्तव्यात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या