Friday, July 3, 2026
Homeगुन्हा१० हजारांची लाच घेताना पकडलेल्या अकोल्यातील सहजिल्हा निबंधकाच्या जळगावातील घरातून तब्बल २.९४...

१० हजारांची लाच घेताना पकडलेल्या अकोल्यातील सहजिल्हा निबंधकाच्या जळगावातील घरातून तब्बल २.९४ कोटींचा मुद्देमाल जप्त !

१० हजारांची लाच घेताना पकडलेल्या अकोल्यातील सहजिल्हा निबंधकाच्या जळगावातील घरातून तब्बल २.९४ कोटींचा मुद्देमाल जप्त !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क –

अकोला येथील सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, वर्ग-१ पदावर कार्यरत असलेले किरण पुरुषोत्तम चौधरी यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्यानंतर त्यांच्या जळगाव येथील निवासस्थानी टाकण्यात आलेल्या घरझडतीत २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे जळगाव आणि अकोला जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, किरण पुरुषोत्तम चौधरी (वय ५७) यांना दि. २६ जून २०२६ रोजी अकोला येथे १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाणे, अकोला येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीचे जळगाव येथे राहते घर असल्याची माहिती समोर आल्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १८६ अन्वये घरझडतीसाठी कार्यवाही करण्यात आली. जळगाव येथील विष्णुनगर, खाजामिया रोड परिसरातील साईप्रभा आर्केडमधील निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक पोहोचले असता घर बंद आढळले. त्यानंतर पंचांसमक्ष सदर घर व सीलबंद करण्यात आले.दरम्यान, दि. २८ जून २०२६ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास आरोपीच्या काही नातेवाईकांनी सीलबंद घराच्या मागील गॅलरीचे कुलूप तोडून आत प्रवेश केल्याचा प्रकार समोर आला. पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने हा प्रयत्न झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक पोलिसांनी संबंधितांना रंगेहात पकडले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(अ), ३३१(२), २३८ आणि ६२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यानंतर दि. २ जुलै २०२६ रोजी आरोपी किरण चौधरी यांच्या पत्नी सौ. मनीषा चौधरी या जळगाव येथे हजर झाल्यानंतर त्यांच्या उपस्थितीत, दोन शासकीय पंच, गोल्ड व्हॅल्युअर, बँक कॅशियर आणि डॉक्टर यांच्या समक्ष घरझडती घेण्यात आली. या झडतीत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, सोने खरेदीच्या पावत्या, मौल्यवान वस्तू तसेच स्थावर मालमत्तेची कागदपत्रे आढळून आली.

घरझडतीत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

घरझडतीदरम्यान खालीलप्रमाणे एकूण २,९४,६४,८४७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे :

रोख रक्कम – ₹ १,५३,८४,६३०

सोन्याचे दागिने– ४२२.१०० ग्रॅम किंमत ₹ ६०,५७,१३५

स्थावर मालमत्तेची कागदपत्रे – किंमत ₹ ६२,१३,३७६

चांदीचे दागिने– १५४.५०० ग्रॅम किंमत ₹ ३१,४१६

सोने खरेदीच्या पावत्या – ₹११,५२,७४५

घरातील मौल्यवान वस्तू – ₹६,२५,५४५

या कारवाईमुळे आरोपी चौधरी यांच्या मालमत्तेबाबत आणि आर्थिक व्यवहारांबाबत अधिक चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई भारत तांगडे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र,प्रदीप मैराळे, अपर पोलीस अधीक्षक, तसेच कविता फडतरे, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांनी पर्यवेक्षण व घरझडती अधिकारी म्हणून काम पाहिले. तसेच पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्यासह जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.

नागरिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहन

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की,भ्रष्टाचारासंबंधी माहिती असल्यास किंवा कोणताही लोकसेवक लाच मागत असल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी.

संपर्क :

कार्यालय– लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव

संकेतस्थळ– acbmaharashtra.gov.in

ऑनलाईन तक्रार – acbmaharashtra.net

टोल फ्री क्रमांक– 1064

दूरध्वनी– 0257-2235477

या संपूर्ण प्रकरणामुळे अकोला आणि जळगाव जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेत मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या