४५ वर्षीय महिलेच्या गर्भपिशवीतून काढली ३.५ किलोची गाठ .

<img class

डॉ.उल्हास पाटील रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांचे यश
जळगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी सतत पोटदुखी, पोटात दबाव जाणवणे आणि असामान्य रक्तस्त्राव अशा त्रासांनी त्रस्त असलेल्या ४५ वर्षीय महिलेवर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या गर्भपिशवीतून तब्बल साडेतीन किलो वजनाची मोठी गाठ काढण्यात यश मिळविले. वेळेवर निदान आणि तातडीच्या उपचारांमुळे महिलेचे प्राण वाचले असून सध्या तिची प्रकृती चांगली आहे.
याबाबत माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका ४५ वर्षीय महिलेला काही महिन्यांपासून पोटदुखी, पोटात जडपणा आणि दबाव जाणवणे या समस्यांनी त्रस्त होती. त्यासोबतच तिला अनियमित रक्तस्त्रावाचाही त्रास सुरू झाला होता. त्रास वाढत गेल्याने तिने डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात उपचारासाठी धाव घेतली.रूग्णालयात दाखल झाल्यानंतर स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील यांनी तिची सविस्तर तपासणी केली. सोनोग्राफी तसेच आवश्यक रक्ततपासण्या करण्यात आल्या. तपासणीअंती महिलेच्या गर्भपिशवीमध्ये सुमारे २० बाय २० सेंटीमीटर आकाराची मोठी गाठ असल्याचे आढळून आले. याशिवाय गर्भपिशवीत इतर काही लहान गाठीदेखील असल्याचे निदान झाले.गाठीचा आकार मोठा असल्याने आणि त्याचा आसपासच्या अवयवांवर दबाव निर्माण होत असल्याने तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अत्यंत काळजीपूर्वक शस्त्रक्रिया
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांच्यासह डॉ. प्राजक्ता पाटील, डॉ. ऐश्वर्या चलवदे या अनुभवी टीमने शस्त्रक्रियेची संपूर्ण तयारी करून अत्यंत काळजीपूर्वक शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेदरम्यान गर्भपिशवीतील तब्बल साडेतीन किलो वजनाची मोठी गाठ यशस्वीरीत्या बाहेर काढण्यात आली. तसेच इतर लहान गाठींसह संपूर्ण गर्भपिशवी काढण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर महिलेची प्रकृतीत सुधार होत आहे.
महिलांना पोटदुखी, पोट फुगणे, पोटात जडपणा किंवा असामान्य रक्तस्त्राव यांसारखी लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा लक्षणांमागे गर्भपिशवीतील गाठीसारखे गंभीर कारण असू शकते. वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार केल्यास मोठ्या शस्त्रक्रियाही यशस्वी होतात आणि रुग्णाचे प्राण वाचविता येतात. या प्रकरणात वेळेवर निदान झाल्यामुळे आम्हाला यशस्वी उपचार करता आले.डॉ. प्राजक्ता पाटील डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय
महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव खुर्द यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे .

