फुलगाव ग्रामपंचायतीसमोर दिव्यांगांचे ‘भीक मांगो’ आंदोलन; ५ टक्के निधी तात्काळ देण्याची मागणी सरपंचां वर केली चिखल फेक पोलीसात तक्रा भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगांव ता भुसावळ

फुलगाव ग्रामपंचायतीकडून दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीचे वाटप होत नसल्याचा आरोप करत दिव्यांग बांधवांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रा .पं सदस्य महेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात ‘भीक मांगो’ आंदोलन छेडले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना सविस्तर निवेदन देऊन दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत असलेले हक्क तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, सन २०२४-२५ पासून दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या ५ टक्के निधीचे पारदर्शक वाटप करण्यात आलेले नाही. पात्र लाभार्थ्यांना निधी न देता काही मोजक्या व्यक्तींनाच लाभ दिल्याचा आरोप करण्यात आला आहे असतानाही त्याबाबत योग्य माहिती दिली जात नसल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.
संबंधित प्रकरणात कायदेशीर तरतुदींचा उल्लेख करून ग्रामपंचायतीने तातडीने निर्णय घ्यावा, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांचे पगार अदा करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
आंदोलकांनी मासिक सभेत सर्व पात्र दिव्यांगांना हक्काचा निधी वितरित करणे, करसवलती लागू करणे, दरवर्षी विशेष सभा घेऊन निधीचे पारदर्शक वाटप करणे, तसेच दिव्यांगांसाठीच्या योजनांची वेळोवेळी माहिती देण्याबाबत अधिकृत ठराव करण्याची मागणी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास ‘भीक मांगो’ आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर भीमराव शामराव पाटील, भूषण पुंडलिक पाटील, यशवंत अनिल चौधरी, सुरेश नामदेव सोनवणे, सुभाष शांताराम चौधरी, वासुदेव सुभाष शिंदे, रेखा प्रभाकर चौधरी, निलेश राजेश नारखेडे, गोपाळ वसंत सुतार, गोपाळ पंकज चौधरी, पंकज शांताराम चौधरी, जितेंद्र श्रावण कोलते, विनोद शालिग्राम सोनवणे, तनुजा संतोष शिंदे, नियती गिरीश राणे, सुरेश ओंकार सोनवणे, स्वप्निल सुरेश बावस्कर, लोकेश विनोद पाटील, गणेश गंगाधर चौधरी, उमेश रामदास पाटील, कल्पना सुनील शिंदे, हर्षाली बाळू चौधरी, वैभवी रवींद्र गोसावी आदींसह अनेक दिव्यांग बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान फुलगावच्या सरपंचांचा गंभीर आरोप; “दिव्यांग मोर्च्यानंतर माझ्यावर चिखलफेक, जीवे मारण्याचा प्रयत्न”
फुलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर गंभीर आरोप करत वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण सरपंच झाल्यापासून ग्रामपंचायतीत तब्बल १२ ग्रामविकास अधिकारी बदलण्यात आल्याने दिव्यांगांसाठीचा ५ टक्के राखीव निधी रखडला असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सरपंचांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीच्या मासिक सभा जाणूनबुजून तहकूब केल्या जात असून, बैठकीचे व्हिडिओ चित्रीकरणही करू दिले जात नाही. तसेच, यापूर्वीही आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मंगळवारी महेंद्र पाटील यांनी अचानक दिव्यांग बांधवांचा मोर्चा ग्रामपंचायतीत आणल्याची माहिती आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली होती. काही वेळाने ग्रामविकास अधिकारीही घटनास्थळी आले आणि त्यांनी तसेच आपण स्वतः दिव्यांग बांधवांशी चर्चा केल्याचे सरपंचांनी सांगितले.
यानंतर आपण घरी जात असताना महेंद्र पाटील, निळकंठ चौधरी आणि सिद्धांत चौधरी यांनी आपल्या तोंडावर चिखलफेक केल्याचा गंभीर आरोप सरपंचांनी केला आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित व्यक्तींची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पुढील तपासानुसार वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

