Friday, July 10, 2026
Homeजळगावजळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

जळगावला आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र; मुंबईच्या फेऱ्यांपासून नागरिकांची सुटका

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – आधार कार्डाशी संबंधित तक्रारींच्या निराकरणासाठी आता जळगावकरांना मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) प्रादेशिक कार्यालय, मुंबई यांच्या माध्यमातून ‘शिरसोली रोडवरील पुरुषोत्तम नगर, डी-मार्टजवळील मिश्री हाईट्स’ येथे अत्याधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्राचे उद्घाटन UIDAI प्रादेशिक कार्यालय, मुंबईचे उपमहासंचालक कॅप्टन लवकेश ठाकूर यांच्या हस्ते तहसीलदार शीतल राजपूत यांच्या प्रमुख उपस्थित आज झाले. यावेळी युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय मुंबईचे उपसंचालक मंदार जेवरे आदींसह सेवा पुरवठादार संस्था ‘बीएलएस’ चे इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यापूर्वी आधारशी संबंधित तांत्रिक व गुंतागुंतीच्या प्रकरणांसाठी नागरिकांना मुंबईतील प्रादेशिक कार्यालयात जावे लागत होते. त्यामुळे प्रवास, वेळ आणि खर्चाचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागत होता. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांना याचा अधिक त्रास होत होता. राज्य शासनाच्या पुढाकारातून तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या विशेष प्रयत्नांतून हे केंद्र सुरू झाले आहे. त्यामुळे मुंबईत उपलब्ध असलेल्या अनेक सेवा आता जळगावमध्येच मिळणार असून नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.

संपूर्ण केंद्र वातानुकूलित असून अत्याधुनिक संगणक प्रणाली, सुरक्षित नेटवर्क आणि डेटा प्रक्रिया सुविधा उपलब्ध आहेत. नवीन आधार नोंदणी तसेच 5 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मोफत बायोमेट्रीक अपडेट, लोकसंख्या शास्त्रीय दुरुस्ती आणि जागेवरच तक्रार निवारण यांसारख्या सेवा उपलब्ध असतील. आधार नोंदणी, नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ई-मेल व बायोमेट्रिक अद्ययावत करणे आदी सर्व सेवा येथे दिल्या जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी घरपोच सेवेची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच केंद्र आठवड्याचे सातही दिवस कार्यरत राहणार असून सार्वजनिक सुट्यांमध्येही आवश्यक सेवा सुरू राहतील.सेवा प्रक्रियेत कागदपत्रांची पडताळणी करून टोकन प्रणालीद्वारे नागरिकांना सेवा दिली जाणार आहे. तसेच आधारच्या संकेतस्थळावरुन आपल्या सोयीनुसार वेळ घेता येईल. त्यामुळे गर्दी, गोंधळ आणि रांगेत तासन तास थांबण्याची वेळ टळणार आहे. केंद्रात प्रशस्त आसनव्यवस्था, आठ स्वतंत्र सेवा काऊंटर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे तसेच दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या आधुनिक केंद्रामुळे आधारविषयक सेवा अधिक सुलभ, जलद व दर्जेदार पद्धतीने उपलब्ध होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या