भुसावळात भटक्या कुत्र्यांचा वाढता धुमाकूळ; विविध भागांत नागरिकांवर हल्ले, अनेक जखमी !

लहान मुलासह ज्येष्ठ महिला जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, तातडीच्या कारवाईची जोरदार मागणी
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांसाठी गंभीर समस्या बनत चालला आहे. शुक्रवारी विठ्ठल मंदिर वार्ड, नेब कॉलनी, कस्तुरी नगर, मुक्तानंद कॉलनी, काशीविश्वनाथ मंदिर परिसर तसेच देना नगर या भागांत भटक्या कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विठ्ठल मंदिर वार्ड येथे एका ज्येष्ठ महिलेला भटक्या कुत्र्याने चावा घेतला. तर नेब कॉलनी परिसरात एका लहान मुलाच्या कानाला कुत्र्याने चावा घेतल्याने त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याशिवाय कस्तुरी नगर, मुक्तानंद कॉलनी, काशीविश्वनाथ मंदिर परिसर आणि देना नगर येथेही एका व्यक्तीसह अन्य नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये एकूण तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. वारंवार अशा घटना घडत असतानाही संबंधित यंत्रणेकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी विठ्ठल मंदिर वार्ड, नेब कॉलनी, कस्तुरी नगर, मुक्तानंद कॉलनी, काशीविश्वनाथ मंदिर परिसर आणि देना नगर येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

