टिटवाळ्यात पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे अग्निशमन विभागाला निवेदन-आपत्कालीन बचाव यंत्रणा तात्काळ सज्ज करण्याची मागणी!

कल्याण खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – टिटवाळा शहर, मांडा परिसर तसेच काळू नदीच्या वाढत्या जलपातळीमुळे संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने टिटवाळा अग्निशमन केंद्राचे प्रमुख अग्निशमन अधिकारी यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या संरक्षणासाठी आपत्कालीन बचाव यंत्रणा तात्काळ युद्धपातळीवर सज्ज करण्याची मागणी करण्यात आली.
या निवेदनात टिटवाळा शहर, मांडा परिसर आणि काळू नदीलगतच्या सखल भागांमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा उल्लेख करण्यात आला आहे. पूरस्थिती अधिक गंभीर झाल्यास नागरिक अडकणे, घरे व दुकाने पाण्याखाली जाणे, विद्युत अपघात, झाडे व भिंती कोसळणे, वाहतूक व्यवस्था विस्कळीत होणे, दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरणे तसेच लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मनसेने स्पष्ट केले.मनसेच्या या सर्व पदाधिकारी यांनी निवेदनात असे म्हटले आहे की,तात्पुरत्या स्वरूपात प्रशिक्षित जल-बचाव पथके, मोटारचलित रेस्क्यू बोटी, इन्फ्लेटेबल बोटी, लाईफ जॅकेट, लाईफ बॉय, बचाव दोरखंड, उच्च क्षमतेचे पाण्याचे उपसा पंप, पोर्टेबल सर्च लाईट, जनरेटर, अग्निशमन वाहन, रुग्णवाहिका, फिरते वैद्यकीय पथक, नियंत्रण कक्ष आणि इतर आवश्यक आपत्ती व्यवस्थापन साहित्य तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच काळू नदीच्या जलपातळीवर सातत्याने देखरेख ठेवून धोक्याची सूचना नागरिकांना वेळेत देणे,आवश्यकतेनुसार सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे आणि सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून बचावकार्य राबविण्याचीही मागणी करण्यात आली.हे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ॲड. अविनाश पांडुरंग शिळकंदे (उच्च न्यायालयाचे वकील तथा उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार सेना) यांनी सादर केले.यावेळी श्री.राम भोईर (महाराष्ट्र सैनिक), श्री. दिलीप पूनमचंद राठोड (विशेष कार्यकारी अधिकारी तथा महाराष्ट्र सैनिक), श्री. गिरीश यशवंतराव आणि ॲड. श्री. महेश गायकवाड (उच्च न्यायालयाचे वकील व भारत सरकार मान्यताप्राप्त नोटरी) उपस्थित होते.
सदर निवेदन श्री. उल्हास दादा भोईर, मनसे जिल्हाध्यक्ष तसेच श्री. दिनेश भोय, मनसे उपजिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले असून, प्रशासनाने या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी ठाम भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने व्यक्त केली.

