मित्राच्या पत्नीशी अनैतिक संबंधातून मित्राचाच खून; पोलिसांनी २४ तासांत उलगडले हत्येचे गूढ!

दारू पाजून शेतात नेले, गळा आवळून हत्या; मुख्य आरोपीसह दोघांना अटक, मध्यप्रदेशातून आरोपी जेरबंद
रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रावेर तालुक्यातील नांदूरखेडा शिवारात ३० वर्षीय युवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, मित्राच्या पत्नीशी असलेल्या कथित अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत छडा लावत रावेर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
मृत युवकाचे नाव शेख कुर्बान (३०) असे असून, त्याचा मृतदेह शनिवारी (११ जुलै) सकाळी नांदूरखेडा शिवारातील कपाशीच्या शेतात आढळला. शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली.तपासादरम्यान मुख्य संशयित गणेश संजय घोरपडे (२७, भोर, ता. रावेर) याचे मृताच्या पत्नीशी कथित अनैतिक संबंध असल्याचे निष्पन्न झाले. एप्रिल २०२६ मध्ये ऐनपूर येथे दोघांना रंगेहात पकडल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर झालेल्या वादातून आरोपीने मृताला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहितीही समोर आली.पोलिसांच्या तपासानुसार, ९ जुलैच्या रात्री गणेश घोरपडे व त्याचा साथीदार मेघराज वसंत सांगळे (२९, भोर, ता. रावेर) यांनी शेख कुर्बान याला दारू पाजून मोटारसायकलवरून नांदूरखेडा शिवारात नेले. तेथे दोघांनी मिळून त्याचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह कपाशीच्या शेतात टाकून फरार झाले.या प्रकरणी मृताचा भाऊ शेख सलमान शेख शब्बीर (रा. उचंदा, ता. मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान मेघराज सांगळे याला प्रथम अटक करण्यात आली. त्यानंतर मुख्य आरोपी गणेश घोरपडे हा मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील सागवानी येथे लपून बसल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.पोलीस निरीक्षक संदीप पाटील व पोलीस उपनिरीक्षक तुषार सुधाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या तपासात रावेर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत खुनाचा उलगडा करून आरोपींना जेरबंद केल्याने त्यांच्या तत्पर कामगिरीचे कौतुक होत आहे.

