दीपनगर ६६० मेगावॅट प्रकल्पाचे दूषित पाणी तापी नदीत? पुढील गावांच्या पाणीपुरवठ्यावर धोक्याची शक्यता

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील दीपनगर येथील ६६० मेगावॅट वीज प्रकल्पातून बाहेर पडणारे दूषित सांडपाणी योग्य प्रक्रिया न करता नदीपात्रात सोडले जात असल्याचा आरोप समोर आला असून, त्यामुळे तापी नदीच्या पाणीप्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांसह पुढील भागातील पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात तेल (ऑइल), रासायनिक घटक तसेच राखमिश्रित पाण्याचा समावेश असून, या पाण्यावर आवश्यक प्रक्रिया न करता ते प्रकल्पाच्या मागील बाजूने भोगावती नदीपात्रात सोडले जात आहे. भोगावती नदी पुढे तापी नदीला मिळत असल्याने हे दूषित पाणी तापीच्या प्रवाहात मिसळत असल्याचा दावा करण्यात येत आहे.

तापी नदीवरून रेल्वे प्रशासन, भुसावळ शहर, जळगाव एमआयडीसीसह अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. अशा परिस्थितीत नदीचे पाणी दूषित झाल्यास पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हे सांडपाणी चोवीस तास सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.
दिपनगर प्रशासन प्रदूषणाबाबत जागृत नसल्याचे हे जिवंत उदाहरण आहे .
या प्रकरणाची संबंधित प्रदूषण नियंत्रण यंत्रणा आणि दीपनगर प्रकल्प प्रशासनाने तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी तसेच आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

