Monday, July 13, 2026
Homeगुन्हाशेअर मार्केटमध्ये दुप्पट नफ्याचे आमिष; कापड व्यावसायिकाची ९ लाखात ऑनलाइन फसवणूक !

शेअर मार्केटमध्ये दुप्पट नफ्याचे आमिष; कापड व्यावसायिकाची ९ लाखात ऑनलाइन फसवणूक !

शेअर मार्केटमध्ये दुप्पट नफ्याचे आमिष; कापड व्यावसायिकाची ९ लाखात ऑनलाइन फसवणूक !

व्हॉट्सअॅप ग्रुप, बनावट IPO आणि खोट्या नफ्याचे आमिष; पैसे काढण्याच्या वेळी फसवणुकीचा झाला पर्दाफाश

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शेअर मार्केटमध्ये अल्पावधीत दुप्पट नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका कापड व्यावसायिकाची तब्बल 9 लाख 35 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी टी.एम. नगर, सिंधी कॉलनी येथील रहिवासी गोपाल टीकमदास पोपटानी (वय 42) यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर अज्ञात सायबर ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 जून रोजी गोपाल पोपटानी यांना एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅप संदेश आला. त्यामध्ये विशेष गुंतवणूक गटामार्फत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर त्यांना एक अॅप डाउनलोड करण्यास सांगण्यात आले आणि व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सहभागी करण्यात आले.या ग्रुपमध्ये अनन्या कुलकर्णी, गुल टेकचंदानी आणि इतर अॅडमिन नियमितपणे शेअर मार्केट व IPO संदर्भातील माहिती देत गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत होते. नामांकित कंपनीसोबत भागीदारी असल्याचा दावा करत त्यांनी दुप्पट परताव्याचे आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेवून पोपटानी यांनी आधार कार्ड, पॅन कार्डसह वैयक्तिक माहिती दिली आणि सुरुवातीला 1 लाख 25 हजार रुपये गुंतवले.यानंतर 40 हजार रुपयांची आणखी गुंतवणूक केल्यानंतर त्यांच्या खात्यात 80 हजार रुपयांचा नफा झाल्याचे दाखवण्यात आले. त्यामुळे त्यांचा विश्वास अधिक दृढ झाला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांनी एकूण 9 लाख 35 हजार रुपये गुंतवले. ऑनलाइन खात्यात 18 लाख 46 हजार 351 रुपयांचा अभासी नफा दिसत असल्याने त्यांनी 9 जुलै रोजी 10 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र पैसे काढता न आल्याने त्यांनी ग्रुपमधील अॅडमिनशी संपर्क साधला असता, IPO प्रक्रियेसाठी आणखी 32 लाख 95 हजार रुपये जमा करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर आपली फसवणूक झाल्याची खात्री झालेल्या पोपटानी यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात ऑनलाइन ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या