Tuesday, July 14, 2026
Homeगुन्हाअंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; आईलाही संपविण्याचा प्रयत्न, पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा!

अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; आईलाही संपविण्याचा प्रयत्न, पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा!

अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; आईलाही संपविण्याचा प्रयत्न, पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा!

अपघाताचा बनाव पोलिसांनी उधळला; सखोल चौकशीनंतर धक्कादायक सत्य समोर, यावल पोलिसांची तातडीची कारवाई !

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – यावल तालुक्यातील किनगाव येथे सुरुवातीला अपघात म्हणून समोर आलेल्या घटनेने पोलिसांच्या तपासानंतर धक्कादायक वळण घेतले आहे. साडेतीन वर्षांच्या दृष्टिहीन चिमुकल्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी त्याची आई सरस्वती पाटील यांच्या तक्रारीवरून पती आणि सासूविरुद्ध खुनाचा तसेच खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे.

१३ जुलै रोजी सकाळी किनगाव शिवारातील शेतातील विहिरीत सरस्वती पाटील आणि त्यांचा साडेतीन वर्षीय मुलगा कृष्णा पडल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत कृष्णाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या सरस्वती यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुरुवातीला हा अपघात असल्याचे मानले जात होते.मात्र, घटनेतील काही बाबी संशयास्पद वाटल्याने यावल पोलिसांनी सखोल तपास सुरू केला. उपचारादरम्यान सरस्वती यांची पुन्हा चौकशी करण्यात आली असता त्यांनी धक्कादायक आरोप केले. शेतातील विहिरीच्या पूजेदरम्यान सासूने स्वतःला आणि मुलाला विहिरीत ढकलल्याचा तसेच या कटात पतीचाही सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला.विहिरीत पडल्यावर लाकडी फाउंडेशनचा आधार मिळाल्याने सरस्वती यांचा जीव वाचला. मात्र, लहानगा कृष्णा पाण्यात बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गर्भपाताच्या वादातून घडल्याचा संशय

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सरस्वती या ७० टक्के दृष्टिहीन, तर त्यांचे पती शंभर टक्के दृष्टिहीन आहेत. त्यांचा मुलगाही दृष्टिहीन जन्माला आला होता. गर्भावस्थेदरम्यान डॉक्टरांनी बाळ दृष्टिहीन असण्याची शक्यता व्यक्त केल्यानंतर गर्भपात करण्यावरून पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण झाले होते. सरस्वती यांनी गर्भपातास नकार दिल्यामुळे दोघांमध्ये सातत्याने वाद होत असल्याचे तपासात समोर आले आहे.

दोघेही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०३(१), १०९(१) आणि ३(५) अन्वये खुनाचा व खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती स्वप्निल पाटील आणि सासू आशाबाई पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.सुरुवातीला अपघात म्हणून समोर आलेल्या या घटनेमागील कथित कट उघड झाल्याने यावल तालुक्यासह संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या