मध्यरात्री एलसीबीचा ड्रग्ज माफियांवर धडक छापा; ३ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त, दोघे जेरबंद!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरात वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीवर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत मध्यरात्रीच्या सुमारास एमडी (मॅफेड्रोन) ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना रंगेहाथ अटक केली.
या कारवाईत सुमारे ३ लाख रुपये किमतीचे ५६.२९ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. मात्र, कारवाईची चाहूल लागताच या ड्रग्जचा मुख्य पुरवठादार भैय्या सोनवणे अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली असून कांचननगर येथील त्याच्या घराचीही झाडाझडती घेण्यात आली.ही कारवाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील शासकीय तांत्रिक विद्यालयाशेजारी असलेल्या जी.एस. ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराजवळ मंगळवारी पहाटे सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई केली.
या वेळी जयेश देविदास तायडे (२७, रा. हरी ओम नगर) आणि हितेंद्र शिवाजी परदेशी (३१, रा. कांचन नगर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ५६.२९ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले असून त्याची बाजारमूल्य सुमारे ३ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.अटकेतील दोघांची चौकशी केली असता, जप्त करण्यात आलेले ड्रग्ज भैय्या सोनवणे याने विक्रीसाठी पुरविल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू करत कांचननगर येथील घराची झाडाझडती घेतली. फरार संशयिताचा शोध सुरू असून या प्रकरणातील ड्रग्ज पुरवठा साखळी उघड करण्याच्या दृष्टीने पोलिसांकडून तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.

