धावत्या रेल्वेची धडक; हरिविठ्ठल नगरातील ४७ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव शहरातील खंडेरावनगर परिसरात धावत्या रेल्वेची धडक लागून हरिविठ्ठल नगर येथील सुभाष सीताराम महाजन (वय ४७) यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना १२ जुलै रोजी जळगाव-शिरसोली रेल्वेमार्गावरील खंडेरावनगरजवळ घडली.
रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खांबा क्रमांक ४१६/९ ते ४१६/११ दरम्यान रेल्वे रुळांवर एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडल्याची माहिती उप-स्टेशन प्रबंधकांनी पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस हवालदार जितेंद्र राठोड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.काही वेळातच घटनास्थळी आलेल्या नातेवाईकांनी मृताची ओळख सुभाष सीताराम महाजन अशी पटवून दिली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला.
या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार जितेंद्र राठोड करीत आहेत. प्राथमिक माहितीनुसार हा अपघाती मृत्यू असल्याचे समोर आले असून, पोलिसांकडून सर्व बाबींचा तपास सुरू आहे.

