Tuesday, July 14, 2026
Homeजळगावभुसावळच्या राजकारणाकडे पुन्हा नजर; नगराध्यक्ष प्रकरणाची सुनावणी आता २८ जुलैला !

भुसावळच्या राजकारणाकडे पुन्हा नजर; नगराध्यक्ष प्रकरणाची सुनावणी आता २८ जुलैला !

भुसावळ नगराध्यक्ष अपात्रता प्रकरण; उच्च न्यायालयात सुनावणी, पुढील तारीख २८ जुलै!

दोन्ही बाजूंची प्राथमिक बाजू ऐकून संबंधितांना पुन्हा नोटिसा; १६ जुलैच्या पालिका सर्वसाधारण सभेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जात प्रमाणपत्र प्रकरणात शासनाने अपात्र ठरविलेल्या भुसावळच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष गायत्री भंगाळे-गौर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवार (१४ जुलै) रोजी सुनावणी झाली. निकालाची उत्सुकता असताना न्यायालयाने दोन्ही बाजूंचे प्राथमिक म्हणणे ऐकून घेत संबंधितांना पुन्हा नोटिसा बजावण्याचे निर्देश दिले असून, प्रकरणाची पुढील सुनावणी २८ जुलै रोजी निश्चित करण्यात आली आहे.
न्या. किशोर संत आणि न्या. अजित कडेठाणकर यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत नगराध्यक्ष गायत्री भंगाळे-गौर यांच्या वतीने अॅड. संजीव देशपांडे यांनी बाजू मांडली. तर याचिकाकर्ते राहुल तायडे यांच्या वतीने अॅड. महेश देशमुख आणि अॅड. वसंत भोलाणकर यांनी कामकाज पाहिले.१४ जुलैच्या सुनावणीतच निकाल लागण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने भुसावळकरांचे लक्ष न्यायालयीन प्रक्रियेवर लागले होते. मात्र न्यायालयाने अधिक सविस्तर सुनावणीसाठी २८ जुलैची तारीख निश्चित केल्याने आता पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भुसावळ नगरपालिकेची भाजप सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळातील पहिली सर्वसाधारण सभा गुरुवार, १६ जुलै रोजी होणार आहे. सभेच्या अजेंड्यावर तब्बल ३०० हून अधिक विषय असून, नगराध्यक्ष अपात्रता प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या सभेतील राजकीय घडामोडींनाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेसह पालिकेतील आगामी राजकीय घडामोडींकडेही शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या