अत्यंत जड अंत:करणाने दादांना अभिप्रेत कार्यक्रमांनी पार पडणार जनसेवा सप्ताह

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा नियोजन बैठकीत विविध उपक्रमांचा आराखडा
यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२०
लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे २२ ते २८ जुलै दरम्यान राज्यभर ‘जनसेवा सप्ताह’ विविध लोकोपयोगी उपक्रमांनी आयोजित करण्यात आला आहे. हा सप्ताह अत्यंत जड अंत:करणाने, मात्र स्व. अजितदादा यांना अभिप्रेत असलेल्या लोककल्याणकारी कार्यक्रमांद्वारे साजरा केला जाणार असल्याची माहिती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय प्रभारी तथा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार अनिलदादा पाटील यांनी दिली.
रविवारी दि.१९ रोजी यावल येथील बोरावल रस्त्यावरील स्टार लॉन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रावेर लोकसभा मतदारसंघाची जनसेवा सप्ताह नियोजन बैठक आमदार अनिलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीच्या प्रारंभी लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार अनिलदादा पाटील यांनी जनसेवा सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मतदार यादी पुननिरीक्षण मोहिमेत बूथनिहाय बीएलओ नियुक्त करून गावापासून जिल्हास्तरापर्यंत काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महिलांसाठी सुरक्षा जागरूकता मेळावे, स्वयंसहाय्यता गट जोडणी, महिला वचन अभियानांतर्गत पोलीस स्टेशन भेटी यांसह विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी “झाडे दादांची – सावली गावाची” या संकल्पनेतून वचननामा वृक्षारोपण सप्ताह राबवून प्रत्येक गावात शाळा, महाविद्यालये व ग्रामपंचायत हद्दीत किमान १०० वृक्ष लागवड करण्याचे तसेच “एक कार्यकर्ता – एक झाड” हा संकल्प राबविण्याचे आवाहन करण्यात आले.
प्रत्येक तालुक्यात चार ते पाच मोफत आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधक फवारणी व जनजागृती, आयुष्यमान भारत व महाराष्ट्र आरोग्य योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मदत असे उपक्रम आयोजित करण्याचेही निर्देश देण्यात आले.
शेतकरी, शेतमजूर व कामगारांसाठी पीकविमा, कर्जमाफी आदी प्रश्नांवर गावागावांत समस्या नोंदवून त्याचा पाठपुरावा करणे, मनरेगा व श्रमिक कार्ड नोंदणी शिबिरे आयोजित करणे तसेच बांधकाम व औद्योगिक कामगारांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.
युवक व विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन प्रवेश मार्गदर्शन व समुपदेशन शिबिरे, मदत कक्ष, शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारधारेवर आधारित निबंध, व्याख्याने व परिसंवाद तसेच स्वर्गीय अजितदादांचे व्यक्तिमत्त्व आणि राज्याच्या विकासातील त्यांच्या निर्णयांवर आधारित निबंध स्पर्धा आयोजित करण्याचेही सुचविण्यात आले.
बैठकीला प्रदेश सरचिटणीस रवींद्र नाना पाटील, प्रदेश प्रवक्त्या श्रीमती प्रतिभाताई शिंदे, चोपड्याचे माजी आमदार कैलासबापू पाटील, चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन घनश्याम अण्णा पाटील, जिल्हा बँकेचे संचालक व उद्योजक घनश्याम अग्रवाल, सावदयाचे माजी नगराध्यक्ष नगरसेवक राजेश वानखेडे, ज्येष्ठ नेते आनंदराव देशमुख, रावेरचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे, जिल्हा उपाध्यक्ष गुणवंतभाऊ नीळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष व फैजपूरचे माजी नगराध्यक्ष शेख कुरबान, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोपान दुट्टे, ज्येष्ठ नेते भगतसिंग पाटील, रावेर तालुकाध्यक्ष योगेश पाटील, जामनेर तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वरभाऊ (नाना) पाटील, चोपडा तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासो. विजय पाटील, भुसावळ तालुकाध्यक्ष विलास पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष गोपाळ पाटील, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष मुन्ना सोनवणे, यावल तालुका कार्याध्यक्ष जितेंद्र सोनवणे, यावल शहर कार्याध्यक्ष कदीर खान, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पाटील, रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, मुक्ताईनगरचे माजी नगराध्यक्ष आसिफ बागवान, विधानसभा अध्यक्ष विजय सोनार, फैजपूर शहराध्यक्ष रज्जाक इकबाल शेख यांच्यासह रावेर लोकसभा क्षेत्रातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघातील रावेर, भुसावळ, चोपडा, फैजपूर, यावल व सावदा येथील नवनिर्वाचित नगरसेवकांचा लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
बैठकीत प्रदेश प्रवक्त्या श्रीमती प्रतिभा शिंदे, चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन घनश्याम पाटील, यावलचे भगतसिंग पाटील तसेच सावद्याच्या युवा नगरसेविका कु. सिमरन वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस विवेक ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यावल नगरपालिकेच्या पक्षाच्या गटनेत्या सौ. वर्षा चोपडे, यावल तालुक्याचे कार्याध्यक्ष अँड. देवकांत पाटील, राष्ट्रवादी युवक यावल तालुका अध्यक्ष आकाश चोपडे, चुंचाळ्याचे विनोद पाटील, यावल महिला शहराध्यक्ष सौ. योगिता घोडके आदींनी परिश्रम घेतले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी आभार मानले.

