Tuesday, July 28, 2026
Homeगुन्हाब्रेकिंग : बनावट 'शालार्थ आयडी' घोटाळ्यात भाजप नेते संजय गरुड अटकेत !

ब्रेकिंग : बनावट ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात भाजप नेते संजय गरुड अटकेत !

ब्रेकिंग : बनावट ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात भाजप नेते संजय गरुड अटकेत !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – राज्यात गाजत असलेल्या बहुचर्चित बनावट ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात विशेष तपास पथकाने (एसआयटी) मोठी कारवाई करत शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते संजय गरुड यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणात आणखी काही संस्थाचालक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तपासादरम्यान संजय गरुड यांच्या संस्थेतील तब्बल १७७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी अवघ्या एका दिवसात तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या संशयास्पद आयडींच्या आधारे शासकीय निधीचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. याच पार्श्वभूमीवर एसआयटीने त्यांना ताब्यात घेतले.संजय गरुड गेल्या काही दिवसांपासून तपास यंत्रणेला चकवा देत होते. अखेर नाशिक एसआयटीच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील एका फ्लॅटमधून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.या प्रकरणात यापूर्वी माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या अटकेनंतर संजय गरुड यांच्यावरील कारवाई ही तपासातील दुसरी मोठी कारवाई मानली जात आहे. तपासाची व्याप्ती वाढत असून, आणखी काही मोठे संस्थाचालक आणि शिक्षण विभागातील अधिकारी एसआयटीच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे.
संजय गरुड हे जळगाव जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील परिचित व्यक्तिमत्त्व मानले जातात. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेसमधून केली होती. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय राहिले आणि जामनेर विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडणूक लढवली. ३० जानेवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता, बनावट शालार्थ आयडी घोटाळ्याचा तपास वेगाने सुरू असून, आगामी काळात या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे आणि मोठ्या कारवाया होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या