वाळू माफियांचा हैदोस! तहसीलदारांनाच रस्त्यात अडवून डंपर पळवला; महसूल अधिकाऱ्यांवर दादागिरी
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू तस्करी करणाऱ्या माफियांची दहशत पुन्हा एकदा समोर आली आहे. बोदवड तालुक्यात अवैध वाळूची वाहतूक करणारा डंपर पकडून तहसील कार्यालयाकडे आणत असताना, थेट तहसीलदारांचाच रस्ता अडवून त्यांना दमदाटी करत डंपर पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे महसूल प्रशासनासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, बोदवडचे तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांना कोल्हाडी परिसरातून अवैध वाळू वाहतुकीची माहिती मिळाली होती. त्यानुसार नायब तहसीलदार अनिल नाडे, कर्मचारी सचिन पाटील आणि महसूल पथकाने कारवाई करत MH 28 BB 7935 क्रमांकाचा वाळूने भरलेला डंपर ताब्यात घेतला. आवश्यक कागदपत्रे नसल्याने तहसीलदार सपकाळे आणि महसूल सेवक ज्ञानेश्वर सुरडकर स्वतः डंपरमध्ये बसून तो तहसील कार्यालयाकडे घेऊन निघाले.मात्र, नाडगाव उड्डाणपुलाजवळ MH 14 GA 8447 क्रमांकाच्या काळ्या महिंद्रा स्कॉर्पिओमधून आलेल्या सहा ते सात जणांनी डंपरचा रस्ता अडवला. त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना धमकावत जबरदस्तीने खाली उतरवले. त्यानंतर रस्त्याच्या कडेला डंपरमधील वाळू रिकामी करून वाहन घेऊन घटनास्थळावरून फरार झाले.या संपूर्ण घटनेदरम्यान तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांनी प्रसंगावधान राखत मोबाईलवर या प्रकाराचे चित्रीकरण केले. त्यांच्या फिर्यादीवरून डंपर चालक आकाश सिंग ठाकूर (रा. सालीपुरा, ता. मलकापूर, जि. बुलढाणा) आणि त्याच्या सहा अज्ञात साथीदारांविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा, दमदाटी आणि इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, देवधाबा, चिंचखेडा, शिरसाळा आणि कोल्हाडी मार्गे मलकापूरच्या दिशेने रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूची तस्करी सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. यापूर्वीही महसूल अधिकाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या असून, या ताज्या प्रकारामुळे वाळू माफियांविरोधात कठोर आणि प्रभावी कारवाईची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. आता बोदवड पोलिस प्रशासन या माफियांवर किती कठोर कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.