शेतजमिनीच्या मोजणीसाठी लाच मागितली अन् सापळ्यात अडकला भूकरमापक!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शेतजमिनीची मोजणी करून देण्यासाठी तब्बल ₹७१ हजार ७०० रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव येथील उप अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक राहुल ताराचंद कोळी (वय ३२) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी (दि. २९ जुलै) रंगेहाथ अटक केली. जळगाव तालुक्यातील फरांज बसस्टॉप परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली. या प्रकरणात कंत्राटी डेटा एंट्री ऑपरेटर कल्पेश सोमनाथ पाटील (वय ३२) याचाही सहभाग निष्पन्न झाल्याची माहिती एसीबीने दिली.
तक्रारदार असलेल्या ४९ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीच्या गट हिस्सा व पोटहिस्सा पडताळणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज करून शासनाचे निर्धारित शुल्क भरले होते. मात्र, हे काम करून देण्यासाठी भूकरमापक राहुल कोळी याने सुरुवातीला ₹७० हजारांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर तक्रारदाराने १७ जुलै २०२६ रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली.तक्रारीच्या पडताळणीत डेटा एंट्री ऑपरेटर कल्पेश पाटील याने नोटीस पाठविण्यासाठी ₹६२५ स्टॅम्प शुल्काची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच प्रत्यक्ष मोजणीच्या दिवशी राहुल कोळी याने स्वतःसाठी व कार्यालयासाठी ₹७०,०००, नोटीस खर्चासाठी ₹१,२०० आणि खाजगी मदतनीसासाठी ₹५०० अशी एकूण ₹७१,७०० रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.यानंतर एसीबीने फरांज बसस्टॉप येथे सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ₹७१,७०० रुपयांची रक्कम स्वीकारताच राहुल कोळी याला पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ मधील संबंधित कलमान्वये जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे, कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे व त्यांच्या पथकाने केली.दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले असून, कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवकाकडून लाचेची मागणी झाल्यास निर्भयपणे एसीबीकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

