इनरव्हील क्लबच्या बाल संस्कार शिबिरात विद्यार्थ्यांना मोबाईलचा वापर मर्यादित ठेवण्याचा सल्ला

चार दिवसीय बाल संस्कार शिबिराचा समारोप
भुसावळ : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ यांच्या वतीने आयोजित चार दिवसीय बाल संस्कार शिबिराचा समारोप आषाढी एकादशीच्या पावन दिवशी उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. चार आठवड्यांच्या या शिबिरातून मुलांमध्ये संस्कार, शिस्त, पर्यावरण संवर्धन, आरोग्य, सुरक्षितता आणि नेतृत्वगुणांचा विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. इनरव्हीलच्या आय.एस.ओ. संगीता जाधवाणी यांनी मुलांचा परिचय करून घेत श्लोकपठण, प्रेरणादायी गोष्टी, योगाभ्यास, नृत्य आदी उपक्रम घेतले.मुलांना योग व ध्यानाचा सराव करून घेण्यात आला. तसेच “गुड टच – बॅड टच” या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करून मुलांना स्वतःच्या सुरक्षिततेबाबत जागरूक करण्यात आले. चित्रकला उपक्रमात मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपली सर्जनशीलता सादर केली. क्लीन अँड ग्रीन” या विषयावर विशेष सत्र आयोजित करण्यात आले. संगीता जाधवाणी यांनी वैयक्तिक स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि वृक्षारोपणाचे महत्त्व मुलांना समजावून सांगितले. माशा बनवणे व चित्रकला या उपक्रमांमध्ये मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला.आषाढी एकादशीचे महत्त्व सांगत मुलांना मोबाईलचा वापर मर्यादित ठेवण्याचा आणि दूरदर्शन कमी पाहण्याचा सल्ला देण्यात आला. पावसातही मुलांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात दिंडी काढत आषाढी एकादशीचा आनंद साजरा केला. पाऊली आणि फुगडी खेळून वातावरण भक्तिमय झाले. यावेळी कोषाध्यक्षा डॉ. रश्मी शर्मा, अॅडव्हायझरी मनीषा जी, सुनंदा जी, किरण जी, पद्मा जी, राधिका जी, आशा जी, क्लब सचिव वैशाली जी, नीलिमा जी, पूजा जी, डॉली जी, सुनीता नेमाडे तसेच डायनॅमिक आय.एस.ओ. संगीता जाधवाणी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. क्लब अध्यक्षा साविता शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या चारही सत्रांचे नियोजन, मार्गदर्शन आणि संपूर्ण प्रायोजन आय.एस.ओ. संगीता जाधवाणी यांनी केले. त्यांच्या उत्कृष्ट नियोजन आणि यशस्वी आयोजनाबद्दल क्लबतर्फे त्यांचा विशेष सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.
या विद्यार्थ्यांनी पटकावली पारितोषिके
मागील सत्रात मुलांना दिलेल्या आंब्याच्या बियांपासून उगवलेल्या रोपांची पाहणी करण्यात आली. उत्कृष्ट सजावट केलेल्या रोपासाठी त्रियांश पवन चौधरी याचा गौरव करण्यात आला. चित्रकला स्पर्धेत भाग्यश्री चौधरी, तर श्लोक स्पर्धेत लक्ष्मी प्रकाश पवार आणि लवली यादव यांनी पारितोषिके पटकावली.

