मलेरिया-डेंग्यू रोखण्यासाठी मनपाची व्यापक मोहीम; ४७ हजारांहून अधिक घरांचे सर्वेक्षण
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू व इतर डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने शहरभर व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली आहे. घरभेटी, डासांच्या अळ्यांचा शोध, पंप फवारणी, फॉगिंग तसेच नागरिकांमध्ये जनजागृती अशा विविध उपाययोजनांद्वारे डासांची उत्पत्ती रोखण्यावर भर देण्यात येत आहे.
२४ जुलैपर्यंत शहरातील ४७ हजार ७०६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. या मोहिमेदरम्यान १ हजार ३३० घरांमध्ये तसेच १ हजार ७९९ पाण्याच्या कंटेनरमध्ये डासांच्या अळ्या आढळून आल्या. आरोग्य विभागाने १ लाख ३६ हजारांहून अधिक पाण्याच्या भांड्यांची तपासणी केली असून त्यापैकी सुमारे ९९ हजार अनुपयोगी कंटेनर रिकामे करून डासांची उत्पत्ती रोखण्याची कार्यवाही करण्यात आली.महानगरपालिकेने शहरातील सर्व १९ प्रभागांमध्ये पंप फवारणी व फॉगिंग मोहीम राबविली आहे. यासोबतच नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस ‘ड्राय डे’ पाळावा, घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये, पाण्याची भांडी नियमित स्वच्छ ठेवावीत तसेच ताप, अंगदुखी किंवा डेंग्यूसदृश लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
महानगरपालिका आयुक्त आदित्य जिवने यांनीही या मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या सहभागामुळेच डासजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविणे शक्य होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.